लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्यांच्या प्रलंबित अहवालांची संख्या ५८६९ झाली आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. नियमीत होणाऱ्या चाचण्या व लॅबची क्षमता यात ताळमेळ नसल्याने ही संख्या वाढल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यात सरसरी रोज तीन ते साडेतीन हजारांवर चाचण्या होत आहेत. दुसरीकडे लॅबची क्षमता ही ९०० चाचण्या प्रतिदिवस इतकी आहे. यात लॅब पूर्ण २४ तास सुरू ठेवल्यानंतर १२०० ते १५०० अहवालांपर्यंत ही क्षमता असते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील लॅबमध्येही दिवसाला ३०० अहवालांची तपासणी होत असल्याची माहिती आहे. मात्र, तपासण्यांची संख्या वाढल्याने प्रलंबित अहवालांची संख्या आता थेट साडे पाच हजारांवर पोहोचली आहे.
आधीच सांगितले जातात चार दिवस
तपासणी केल्यानंतर अहवाल यायला चार दिवस लागतील असे केंद्रांवर आधिच सूचित केले जात आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या रुग्णांपुढे मात्र, हा पेच निर्माण झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांबाबत प्रशासनाकडून अहवाल लवकर येण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी यामुळे मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
गेल्यावेळी संसर्गाला काय कारणीभूत
कोरोना लॅब होण्याआधी धुळे येथे कोरोना तपासणी नमुने पाठविले जात होते. तेव्हा आठवडा ते पंधरा दिवस अहवालांना लागत होते. यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढल्याचा तर्क लावला जाता होता. आता गंभीर प्रकार म्हणजे, आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर क्वारंटाईन केले जात नाही. केवळ एक मॅसेज पाठवून संबधिताला घरी पाठविण्यात येते. मात्र, घरी क्वारंटाईन राहण्याच्या त्यांना सक्त सूचना दिल्या असतात. मात्र, या सूचनांचे पालन होईलच अशी शाश्वती मात्र, प्रशासन घेत नाही. त्यामुळेही ही बाब संसर्ग वाढविण्यात धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हे अहवाल लवकर मिळावे, यासाठी नियोजनाची गरज असल्याचे बोलले जात आहे.