लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बँकेतून पेन्शनचे २५ हजार रुपये काढल्यानंतर रिक्षाने घरी जायला निघालेल्या अशोक सांडू काळे (वय ७२, रा. विवेकानंद नगर) यांच्या खिशातील २५ हजार रुपयांची रोकड रिक्षात बसलेल्या लोकांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक काळे हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. विवेकानंद नगरात पत्नी ललिता यांच्यासह वास्तव्याला आहेत. दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. १ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता पेन्शन काढण्यासाठी बँक ऑफ बडोदा या नवी पेठ शाखेत ते गेले होते. तेथून २५ हजार रुपये काढल्यानंतर ते खिशात ठेवले. बँकेतून ते गुजरात स्वीट मार्टच्या दुकानावर गेले. तेथून त्यांनी दोन समोसे घेऊन पायी चालत चित्रा चौकात गेले. पावणेदोन वाजता रिक्षात बसले. या रिक्षात आधीच तीन जण बसलेले होते. रिक्षात बसण्यापूर्वी त्यातील एक प्रवासी खाली उतरला. काळे बसल्यानंतर हा प्रवासी त्यांच्या शेजारी बसला. पुढे बेंडाळे चौकात आल्यानंतर ‘बाबा तुम्हाला बसता येत नाही, तुम्ही उतरुन जा’ म्हणून त्यांना खाली उतरवण्यात आले. नंतर रिक्षा पुढे निघून गेली. दुसऱ्या रिक्षाची वाट पाहत असताना खिशातील पैसे चाचपडून पाहिले असता ते गायब झाले होते. याप्रकरणी त्यांनी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास किशोर निकुंभ करीत आहे.
महिलेची पर्स लांबविली
दरम्यान, गुरुवारी सकाळी फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची पर्स चोरट्यांनी लांबविली. या पर्समध्ये १७०० रुपये होते. महिलेने शहर पोलीस ठाणे गाठून घटना सांगितली. पोलिसांनी काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र काही मिळून आले नाही. या महिलेने तक्रार दिली नाही.