जळगाव : गेल्या चारशे वर्षांत न दिसलेल्या गुरू आणि शनीच्या महायुतीचा अद्भुत विलक्षण नजारा पाहण्यासाठी जळगावकरांनी खगोल प्रेमींनी आयोजित केलेल्या ठिकाणी एकच गर्दी केली होती.
सुर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरू आणि शनी सायंकाळी एकमेकांच्या अगदी जवळ आल्याने, हा दुर्मीळ क्षण दुर्बिणीतुन पाहुन अनेक जण या घटनेचे साक्षत्कार झाले. अवकाशात सायंकाळी सहा वाजता ही प्रक्रिया सुरू होऊन, रात्री आठपर्यंत सुरू होती.
विद्यार्थांमध्ये कुतूहलाचे वातावरण :
ही घटना जळगावकरांना पाहता यावी, यासाठी खगोल अभ्यासक सतिश पाटील यांनी त्यांच्या घराच्या छतावर दुर्बिणीची व्यवस्था केली होती. या ठिकाणी सायंकाळी साडेपाच पाच पासून शहराच्या विविध भागातील नागरिक आपल्या मुलांना घेऊन आले होते. यावेळी सतिश पाटील यांनी विद्यार्थांना माहिती सांगितली. यावेळी विज्ञान परिषदेचे सचिव दिलीप भारंबे, अनिंसचे कार्याध्यक्ष डिंगबर कट्यारे, निवृत्त प्राध्यापक आर. ए. पाटील, शशिकांत नेहते. विजय लुल्हे, प्रा. पकंज नाले, सुनिता पाटील, प्रा.सुनील दाभाडे, डॉ. विजय बागुल, योग शिक्षक सुनील गुरव, अर्चना गुरव, प्रा. यशवंत सैंदाणे, सविता बोरसे आदी नागरिक उपस्थित होते.
मु.जे.महाविद्यालयात खगोलप्रेमींची गर्दी
खगोल अभ्यासक अमोघ जोशी व मु.जे.महाविद्यालयाच्या भुगोल विभाग प्रमुख प्रा. प्रज्ञा जंगले यांनी मु. जे. महाविद्यालयाच्या भुगोल विभागाच्या छतावर ही घटना पाहण्यासाठी दुर्बिणीची व्यवस्था केली होती. या ठिकाणी विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, मंगळवारीही अवकाशात हा नजराणा दिसणार असल्याने, त्या दिवशींही विद्यार्थांसाठी दुर्बिणीची व्यवस्था केली असल्याचे जोशी यांनी सांगितले.