लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील एकूण १५०२ गावांची पैसेवारी डिसेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात एकाही गावात दुष्काळसदृश स्थिती नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये ५०पैशांच्या वर पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
यंदा जिल्ह्यात पाऊस चांगला झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महसुली गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात एकूण १५०२ महसुली गावे आहेत. त्यात एकाही गावात दुष्काळसदृश स्थिती आढळून आलेली नाही. प्रत्येक वर्षी शासनाकडून जिल्ह्यातील गावांचा आढावा घेऊन ही आकडेवारी जाहीर केली जाते.
ही पैसेवारी नजर पैसेवारी, सुधारित पैसेवारी आणि अंतिम पैसेवारी अशा तीन टप्प्यांमध्ये जाहीर केली जाते. त्यानुसार दुष्काळाची स्थिती जाहीर केली जाते. यंदा दुष्काळाचे निकष बदलले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांतील पर्जन्यमान पाहता यंदा जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नाही. यात दोन प्रकार असतात त्यानुसार एका ठिकाणी पैसेवारी ही २५ पैसेपेक्षा कमी असते. तेथे दुष्काळसदृश स्थितीचा अंदाज असतो. त्यानुसार त्या गावांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. मात्र यंदा एकाही गावात अशी परिस्थिती नसल्याचे महसूल विभागाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.
२०१६ मध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता तयार झाली. त्यानुसार दुष्काळाची व्याख्या पाच पद्धतीने केली गेली आहे. त्यानुसार पाऊस पडला नाही तर दुष्काळ जाहीर केला जातो. तर इतर चार संकेत हे कृषी विभागाशी संबधित आहे. ६८३ मिली एवढा सरासरी पाऊस जिल्ह्याचा आहे. यंदा त्यापेक्षा दोनशे मिली पाऊस जास्त झाला आहे. त्यामुळे पैसेवारीदेखील जाहीर करण्यात आली आहे.
ज्या गावांची पैसेवारी कमी असते त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या अध्यादेशांनुसार मदत केली जाते. त्यांना टँकर पुरवणे आणि इतर मदत केली जाते.
आकडेवारी (सर्व गावे ५० पैसेपेक्षा जास्त)
तालुका गावांची संख्या
जळगाव ९२
जामनेर १५३
एरंडोल ६३
धरणगाव ८९
पारोळा ११४
भुसावळ ५४
बोदवड ५१
मुक्ताईनगर ८१
यावल ८४
रावेर १२०
पाचोरा १२९
भडगाव ६३
अमळनेर १५४
चोपडा ११६
चाळीसगाव १३७