तालुक्यातील ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळेची ओढ लागली आहे. २३ रोजी विद्यार्थ्यांची उपस्थिती ४४ टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. तालुक्यातील आठवी ते बारावीच्या शाळांची संख्या २८ असून एकूण विद्यार्थी संख्या ५,४४८ पैकी शुक्रवारी दोन हजार ३७२ विद्यार्थी शाळेला उपस्थित होते.
एरंडोल तालुक्यात २८८५ पालकांचे संमती पत्र शाळांना प्राप्त झाले आहे. पैकी पंचवीस शाळा सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतीकडून ठराव मिळाले आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी व्ही. एच. पाटील यांनी दिली आहे.
माध्यमिक विद्यालय निपाणे प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय जळू या दोन्ही शाळांचे ठराव ग्रामपंचायतीकडून अजूनही देण्यात आलेले नाही. जळू येथे विद्यार्थ्यांचे संमतीपत्र घेऊन शाळा सुरू करण्यात आली आहे तर निपाणे येथे विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही तसेच सोनबर्डी आश्रमशाळेचे आदिवासी विभागाचे स्वतंत्र पत्र मिळाल्यानंतर कार्यवाही सुरू होईल असे सांगण्यात आले.