ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 17- नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास वेळीच मदत मिळावी म्हणून प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी हेलिपॅड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविला आहे. पूर अथवा अन्य आपत्तीमध्ये कोणी अडकल्यास त्यांना वेळीच मदत मिळण्यास अडचण होते. ऐनवेळी मदतीसाठी नौदल तसेच वायूदलाची मदत घ्यावी लागते. तसेच यासाठी तात्पुरत्या स्वरुपात हेलिपॅड उभारावे लागते. त्यामुळे अशा प्रसंगी वेळीच मदत मिळावी म्हणून बचाव व सुरक्षेसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड असावे, असा निर्णय घेण्यात आला असून जळगाव जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड उभारल्यास आपत्तीप्रसंगी हेलिकॉप्टर उतरविणे, स्टॅण्ड बाय ठेवणे, रात्रीच्या वेळी ते सुरक्षित ठेवणे या सर्व गोष्टी शक्य होणार आहे. या सोबतच आपत्तीप्रसंगी मदत करण्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौ-यासाठी, पोलीस अथवा संरक्षक दलाच्या कोणत्याही कार्यवाहीसाठी मदत होणार आहे.
अहवाल मागविला तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड बांधण्यासाठी सविस्तर अहवाल शासनास सादर करण्याचे जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे. यामध्ये जागा निश्चित करणे, निमशासकीय असल्यास संपादीत करणे, उड्डाण व उतरविण्यासाठी सोयीची जागा असणे, आजूबाजूला कोणतेही अडथळे नसणे, बांधकामाचे अंदाजपत्रक सादर करणे, जागेचे आरक्षण व परिरक्षणाची जबाबदारी निश्चित करणे याबाबत सूचित करण्यात आले असून त्याचा अहवाल सादर करण्याचे कळविण्यात आले आहे.