जळगाव : लॉकडाऊन काळात अवैधरित्या देशी मद्याची विक्री व विना पास वाहतूक केल्याने राजकुमार शितलदास नोतवाणी (रा.आदर्श नगर, जळगाव) यांच्या मालकीचा नशिराबाद येथील होलसेल देशी मद्य विक्रीचा कामदार ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही कारवाई केली आहे. नातेवाणी यांच्या मालकीचे अनेक परवाने रद्द झाले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी लॉकडाऊन काळात २५ एप्रिल रोजी नोतवाणी यांच्या मालकीच्या मेहरुणमधील राज वाईन्सची तपासणी केली असता देशी मद्याच्या ९० मिली क्षमतेच्या २ हजार ९०० बाटल्या विना परिवहन पास मिळून आल्या होत्या. या बाटल्यांची नशिराबाद येथील कामदार ट्रेडर्समधील साठ्याशी पडताळणी केली असता २ हजार ८०० बाटल्यांचे बॅच क्रमांक जुळून आले. लॉकडाऊन काळात अवैधरित्या विक्रीच्या उद्देशानेच या देशी मद्याचा पुरवठा केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्याशिवाय कामदार ट्रेडर्समध्ये ७५० मिली क्षमतेच्या २४, १८० मिली क्षमतेच्या २४० व ९० मिली क्षमतेच्या १० हजार बाटल्या कमी मिळून आल्या. त्यामुळे या बाटल्यांचीही अवैध विक्री झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांच्या अहवालावरुन अधीक्षक नितीन धार्मिक यांनी राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावर १५ मे रोजी उमाप यांनी नशिराबाद येथील कामदार ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द केल्याचा आदेश काढला. याआधी नोतवाणी यांच्या मालकीचा नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स, अजिंठा चौकातील आर.के.वाईन, चाळीसगाव येथील क्रिश ट्रेडर्स, भागीदार असलेले पांचाली हॉटेल, नंदूरबार येथील सोनी ट्रेडर्स यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत.