नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील सर्व कोविड हॉस्पिटलचे फायर ऑडिट मनपा प्रशासनाने त्वरित तपासावे. यात नियमाप्रमाणे पूर्तता नसल्यास ताबडतोब कोविड हॉस्पिटलची परवानगी रद्द करावी, अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्राव्दारे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात अनेक खासगी हॉस्पिटल्सनी कोविड रुग्णालये सुरू केली आहेत. वास्तविक पाहता, फायर ऑडिट तपासून त्यानंतरच परवानगी देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक कोविड हॉस्पिटलमध्ये फायर ऑडिटची पूर्तता झाली नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीची दुर्घटना घडली होती. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने कोविड हॉस्पिटलचे फायर ऑडिट तपासावे. यात आवश्यक ती पूर्तता नसल्यास किंवा नियमांचे पालन केले नसल्यास कोविड हॉस्पिटलची परवानगी रद्द करावी, अशी मागणी ॲड. शुचिता हाडा यांनी केली आहे.