जळगाव : सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने कषी निविष्ठा आणि साहित्यांचा सुलभ पुरवठा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशके व शेतीउपयोगी साहित्याच्या विक्रीसाठी सकाळी सात ते सायंकाळी सात ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. या परवानगीचे पत्र जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित यंत्रणांना पाठवले आहे.
लवकरच खरीप हंगामाला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी खरिपाच्या पूर्वतयारीला लागलेदेखील आहेत. त्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर साहित्याच्या खरेदी-विक्रीसाठी जळगाव डिस्ट्रिक्ट फर्टिलायझर, पेस्टिसाईड आणि सीड्स डीलर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी राऊत यांना परवानगी मागितली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, सर्व तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी यांंना या दुकानांना परवानगी देत असल्याचे पत्र दिले आहे.