सूत्रांनुसार, पंधरा बंगला रेल्वे यार्ड भागात गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलची चोरी होत असून, याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष होत होते. १६ रोजी दुपारी तीनला पंधरा बंगला भागातील क्वार्टर (क्रमांक एबी सेकंड डीएस१०७७ ए.एच.) समोर रस्त्यावर पेट्रोल व डिझेल पडून असल्याची माहिती काही पत्रकारांना मिळाली. खात्री करण्यासाठी ते तेथे गेले. यार्डमध्ये जाण्यासाठी दोन ठिकाणची संरक्षक भिंत चोरट्यांनी फोडलेल्या अवस्थेत दिसली. त्या मार्गाने पत्रकारांनी भ्रमण यार्डातील रेल्वेलाईनवर पाहणी केली. ज्या क्वार्टरसमोर पेट्रोल व डिझेल पडून होते त्यासमोरील संरक्षक भिंतीच्या आडोशाला झुडपांमध्ये प्लॅस्टिकच्या पाच ते सहा कॅन पेट्रोल डिझेलने भरलेल्या होत्या. यामुळे मध्य रेल्वे मंडळ रेल्वे सुरक्षाबल आयुक्त क्षितिज गुरव, सहाय्यक सुरक्षा आयुक्त बी.पी. कुशवा यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठांच्या आदेशावरून घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल विभागाचे ए.एस.आय. अख्तरसिंग हे पाहणीसाठी. खात्री झाल्याने त्यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. काही वेळेतच घटनास्थळी पंधरा बंगला यार्डाचे निरीक्षक दयानंद यादव व कर्मचारी हजर झाले.
माहिती देण्यास टाळाटाळ
झुडपांमध्ये प्लॅस्टिकचे पाच ते सहा कॅन पेट्रोल व डिझेलने भरलेले मिळून आल्याबाबत रेल्वे यार्ड निरीक्षक यांना माहिती पत्रकारांनी विचारली असता त्यांनी टाळाटाळ केली. या चोरी प्रकरणामध्ये यार्डातील काही रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका यामुळे उपस्थित होत आहे.
बोरखेडावरून आलेल्या वॅगनमधून दाखविले ‘काम’
१५ रोजी सकाळी अकराला बी.टी. एफ.एल.एन. वॅगन ही बोरखेडावरून भुसावळ यार्डामध्ये आली व रात्री आठला भुसावळ येथून पानेवाडीसाठी रवाना झाली. यादरम्यान चोरट्यांनी पेट्रोल व डिझेल काढून रात्रीच्या वेळेस वाहनाने भरलेल्या कॅन घेऊन जाण्यास यशस्वी झाले. यादरम्यान पेट्रोल-डिझेल चोरी करताना रस्त्यावर सांडल्याने बुधवारी ही चोरी पकडली गेली. चोरट्यांचा शोध रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी घेत आहे.
रेल्वे यार्डसमोरील क्वार्टरमधून पाच कॅन हस्तगत
पेट्रोल-डिझेल चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पंधरा बंगला यार्डात गुन्हा नोंदल्याची माहिती मध्य रेल्वे मंडळ रेल्वे सुरक्षा बल आयुक्त क्षितिज गुरव यांनी पत्रकारांना दिली. तसेच रेल्वे यार्डसमोरील क्वार्टरमधून पाच कॅन हस्तगत करण्यात आल्या.
याप्रसंगी मध्य रेल्वे मंडळ रेल्वे सुरक्षा बल आयुक्त क्षितिज गुरव, सहाय्यक सुरक्षा आयुक्त बी.पी कुशवा, पंधरा बंगला रेल्वे यार्ड निरीक्षक दयानंद यादव, उपनिरीक्षक एस.बी. गुप्ता, नंदलाल राम, जोगेंद्रसिंग, एएसआय अख्तरसिंग, बाबू चौधरी, वसंत महाजन, पोलीस कॉन्स्टेबल समीर तडवी उपस्थित होते.