पाच महिन्यात साडे आठ रुपयांनी महाग : डिझेलही ९० रुपयांच्या पुढे
जळगाव : गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने भाव वाढ होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या भावात रविवारी पुन्हा एकदा वाढ होऊन पेट्रोलचे भाव १०० रुपयांच्या पुढे पोहोचले आहे. या भाववाढीने पेट्रोल १००.१० रुपये प्रति लिटर झाले आहे तर डिझेलचे भाव देखील ९० रुपयांच्या पुढे जाऊन ते रुपये ९०.२० प्रति लिटर झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भावदेखील रविवारी वाढल्याने पेट्रोल डिझेलचे भाव वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे.नोव्हेंबर २०२० पासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये एप्रिल महिन्याचा थोडासा दिलासा वगळता इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनदेखील पेट्रोल डिझेलचे भाव चांगलेच वाढत गेले. १ जानेवारी ते १६ मे यादरम्यान पेट्रोलचे भाव पाहिले असता ते ८.५२ रुपये प्रति लिटरने तर डिझेलचे भाव ९.७९ रुपये प्रति लिटर लिटरने वाढले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोल ९१.५८ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८०.९० प्रतिलिटर होते. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी पेट्रोल ९४.०६ रुपये प्रति लिटर, १ मार्च रोजी ९८.६१ रुपये प्रति लिटर असे सातत्याने वाढत गेले. त्यासोबतच मे महिन्यात देखील पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली. ४ मे रोजी ९७.८७ रुपये प्रति लिटर असलेले पेट्रोल आठवडाभरात ११ मेपर्यंत ९९.३५ प्रति लिटरवर पोहोचले. तेव्हापासून ही वाढ होत रविवार, १६ मे रोजी पेट्रोलने अखेर शंभर रुपयांचा आकडा पार करीत १००.१० रुपये प्रति लिटरवर ते पोहचले. यासोबतच डिझेलदेखील ९०.२० प्रति लिटरवर पोहोचले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव पाहिले असता नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ते अडीचपटीने वाढले आहे. डिसेंबर २०२० मध्ये ३९.०८ डॉलर असलेले भाव आता ६५.३७ डॉलरवर पोहोचले आहे. रविवारी कच्च्या तेलाचे भाव २.४३ डॉलरने वधारले.