किरण चौधरी ।रावेर : शहरातील छायाचित्रकार यशपालसिंह परदेशी यांनी अमेरिकेतील मिन्नीअॅपॉलीस शहरातील चिमुकल्या आरोहीच्या टिपलेल्या फोटोंनी अमेरिकेत भारतीय संस्कृतीचे वेड लावले आहे.कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अमेरिकेतील मिन्नीलीयापॉलीस या शहरातून मायदेशी आपल्या मूळ गावी रावेर येथे परतलेल्या सात वर्षे वयाच्या चिमुकल्या आरोहीचे भगवंताच्या धावा करणारी संत मीराबाई, खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाईंच्या मायबोलीतील कवितांना भावस्पर्शी असलेले तथा विठुरायाच्या भक्तीत जात्यावर तल्लीन झालेली संत जनाबाई व आदिवासी पाड्यावरील संसाराचे चित्र रेखाटणारी विविध रूपकातील शहरातील छायाचित्रकार यशपालसिंह परदेशी यांनी त्यांच्याच कल्पकतेतून टिपलेल्या छायाचित्रांनी अमेरिकेतील मित्र परिवाराला भारतीय व अस्सल खान्देशी संस्कृतीने भुरळ घातली आहे.भारतीय संस्कृतीने वेडावलेल्या तेथील अमेरिकन कुटूंबीयांनी अशाच प्रकारच्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी छायाचित्र काढण्याची मोहिनी घातल्याची माहिती व तंत्रज्ञान अभियंता राहुल बडगुजर यांनी ह्यलोकमतह्णला दिली.अमेरिकेत कोरोनाच्या लॉकडाऊन होण्यापूर्वी मिनीसोटा प्रांतातील मिनीयापॉलीस शहरातील कूपजेमिनी या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत कार्यरत असलेले वरिष्ठ सल्लागार राहुल नंदकिशोर बडगुजर हे आपल्या मायदेशी रावेरला गत मार्च महिन्यात परतले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय असलेल्या त्या कंपनीने त्यांची लॉकडाऊन काळापुरती पुणे येथे बदली करून घरूनच आॅनलाईन सेवा देण्यासाठी मुभा दिली आहे. म्हणून राहुल बडगुजर, त्यांच्या पत्नी सौ मयुरी व सात वर्षांची मुलगी चि आरोही हे कुटूंब आपल्या परिवारासोबत गत सात महिन्यांपासून रावेर येथे वास्तव्यास आहेत. मूळचे धरणगाव येथील रहिवासी असलेले राहूल बडगुजर यांचे वडील नंदकिशोर बडगुजर यांची राज्य परिवहन महामंडळाच्या रावेर आगारातून वाहक पदावरून आता जळगाव येथे तिकीट निरीक्षक म्हणून बदली झाली आहे.दरम्यान, कोरोनाच्या लॉकडाउननंतर आता अनलॉक सुरू झाल्याने पुन्हा काही कालांतराने आपल्या पूर्ववत अमेरिकेतील सेवेत दाखल होण्याचे वेध राहुल बडगुजर यांना व परिवाराला लागले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये आरोही हिला भारतीय संस्कृतीचे घडवलेले कृतीशील दर्शन आठवणींत जपता यावे म्हणून त्यांनी फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला.हल्ली अॅण्ड्रॉईड मोबाईलपासून ते अत्यंत महागडे डिजिटल कॅमेरे हातात घेऊन फोटोशूट करण्याचे फॅड तरूणाईत फोफावत असले तरी, मूळात हाडाचा चित्रकार असलेल्या व खिरोदा येथील सप्तपूट ललित कला अकादमीत कलाशिक्षकाची पदविका प्राप्त केलेल्या यशपालसिंह परदेशी यांचे कलात्मक छायाचित्रण व छायाचित्र संपादनाचा कलाविष्कार शहरवासीयांसह तालुक्यात मोहिनी घालणारा ठरला आहे. त्या अनुषंगाने राहुल बडगुजर यांनी छायाचित्रकार यशपालसिंह परदेशी यांचा शोध घेत आपल्याला अमेरिकेत या आठवणींचा ठेवा जोपासण्यासाठी फोटो शूट करण्याचा संकल्प मांडला.अभिजात कलेचा पुजारी असलेल्या यशपालसिंह परदेशी यांनी बडगुजर कुटुंंबासमोर संत मीराबाईची भक्ती, संत जनाबाई यांची जात्यावर देहभान झालेली भक्ती, कृतीशील जीवनातील सूक्ष्म निरीक्षणातून मायबोलीत अवतरलेल्या खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या भावस्पर्शी कवितेतील व्यक्तीरेखा, खान्देशी संस्कृतीचे जनजीवन व आदिवासी पाड्यावरील निसर्गाच्या सानिध्यातील संसाराचे चित्र अशा संकल्पना मांडल्या. त्यासाठी राहुल बडगुजर यांनी लागणारे तंबोरा, नऊवारी साडी, सौंदर्य अलंकार, साहित्याची मोठ्या उत्सुकतेने यादी घेऊन संकलन केले.त्यानुसार त्यांनी अमेरिकेतील मिनीयापॉलीस नजीकच्या स्किलवॉटर येथील लिलीलेक एलिमेंटरी स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत धडे घेणाऱ्या आरोही हिचे मंगरूळ धरणाची पार्श्वभूमी घेऊन तंबोरा घेऊन भावविभोर झालेली संत मीराबाई, सखा पांडुरंगांच्या भक्तीत जात्यावर दळण दळताना देहभान विसरणारी संत जनाबाई, अरे संसार संसार... या कवितेत कवयित्री बहिणाबार्इंनी दिलेली ह्यपहिले हाताले चटका मग मियते भाकरह्ण या शिकवणीचे चित्रण करणारे चुलीवरील चित्र, मिक्सर वा ग्राईंडरऐवजी आदिवासी पाड्यावरील सुपड्यावर धान्य पाखडणारी गृहिणी, ठेचणी व खलबत्त्यात ठेचणारी गृहिणी, पाटा व वरवंट्यावरील भाजीचा स्वादिष्ट मसाला तयार करणारी गृहिणी अशा परिश्रमी जीवनशैलीला भारतीय संस्कृतीचे कोंदण घालून छायाचित्रकार यशपालसिंह परदेशी यांनी आपल्या छायाप्रकाशाचा तथा रंगसंगतीचा कलाविष्कार घडवून निसर्गाच्या सानिध्यातील छायाचित्रांचे भावविभोर फोटोशूट केले.राहुल बडगुजर यांनी लॉकडाउनच्या काळात मुलीला घडविलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शनाचे फोटो आपल्या अमेरिकेतील मित्र परिवाराला व्हॉटसअॅप व फेसबुकवर शेअर केले असता भारतीय संस्कृतीने वेडावलेल्या अमेरिकन परिवारांनी आपल्या मुलांचेही भारतीय वेशभूषा व संस्कृतीतील फोटो शूट करण्याचा मोह आवरता आला नसल्याचे राहुुल भारंबे यांनी स्पष्ट केले. अमेरिकेत परतल्यानंतर छायाचित्रकार यशपालसिंह परदेशी यांनाही विशेष फोटो शूटकरीता निमंत्रित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याची पुष्टी जोडली आहे.
लॉकडाऊनमध्ये मुलीच्या छायाचित्रणाला भारतीय संस्कृतीचे दिलेले कोंदण अमेरिकेत भावतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:26 AM