पाचोरा : महावितरणकडून वीजबिलाबाबत तसेच मीटर रीडिंगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाइलवर दिली जाते. छापील वीजबिल ग्राहकांना मिळण्यापूर्वीच मीटर रिडिंगची माहिती त्यांना मिळत असल्यामुळे आता १ फेब्रुवारीपासून महावितरणने वीजबिलावरील मीटर रिडिंगचे छायाचित्र देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रिडिंगची अचूक माहिती मिळावी म्हणून महावितरणने वीजबिलावर मीटर रिडिंगचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याची पद्धत सुरू केली होती. या निर्णयाचा महातिवरणसह ग्राहकांनाही पारदर्शक वीज बिलासाठी उपयोग होत आहे. या पुढचे पाऊल म्हणून डिजिटल युगाशी जुळवून घेत आता महावितरणकडून ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे देण्यात येत आहे. त्यामुळे मोबाइल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजबिल मिळण्यापूर्वीच मीटर रिडिंग घेतल्यानंतर त्याची माहिती तत्काळ उपलब्ध होते. परिणामी ग्राहकांना आपले मीटर रिडिंग पडताळणीसाठी उपलब्ध होते. तसेच मीटर रिडिंगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरुस्त करता येणे शक्य होते. यामुळे छापील बिल मिळण्यापूर्वीच ग्राहकांना मीटर रिडिंग समजू लागल्याने आता यापुढे वीजबिलावरील मीटर रिडिंगचे छायाचित्र देण्याची पद्धत बंद करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.सध्या महावितरणकडे २ कोटी ५० लाख वीजग्राहक आहेत. यापैकी सुमारे दोन कोटी सात लाखांहून अधिक ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. ज्यांनी मोबाइलची नोंदणी केलेली नाही त्यांनी या नव्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिलावरील मीटर रीडिंगचे छायाचित्र होणार गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 5:52 PM