जळगाव : रक्षा बंधनला भाऊ-बहीण जेथे असतील तेथे त्यांची एकमेकांकडे पोहचण्याची तयारी असते. अशाच प्रकारे रेल्वेचा मोटरमन असलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी त्यांची बहीण थेट रेल्वेस्थानकावर पोहचली. या प्रसंगाने ‘वेड्या बहीणीची वेडी माया...’ या पंक्तींचा खरा प्रत्यय आला तो बºहाणपूर रेल्वे स्थानकावर. मात्र हा प्रसंग गेल्या वर्षाचा असला तरी बहिणीच्या ‘वेड्या मायेचे’ हे छायाचित्र यंदाच्या रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची जगभर चर्चा होऊ लागली.भुसावळ येथील रहिवासी श्रीकांत रितपूरकर हे गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी ते इटारसी येथून भुसावळकडे कर्नाटक एक्सप्रेस घेऊन येत होते. त्यांची बºहाणपूर येथे राहणारी बहिण प्रतिभा विनोद मगरे यांचा श्रीकांत यांना रक्षाबंधनासाठी बºहापूरला येण्यासाठी दूरध्वनी आला. मात्र बहिणीला भेटण्याची ओढ असली तरी कर्तव्यावर (ड्युटीवर) असल्याने श्रीकांत यांचा नाईलाज झाला व त्यांनी नकार दिला. मात्र बहिण राखी घेऊन रेल्वे स्थानकावर पोहचली व भावाला राखी बांधली.श्रीकांत रितपूरकर यांनी गेल्या वर्षीचे रक्षाबंधनाचे छायाचित्र फेसबुकवर टाकले होते. ते श्रीकांत यांच्या मित्रांनी यंदा रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोशल मीडियावर व्हायरल केले. देशविदेशात ते पोहचल्याने श्रीकांत रितपूरकर व त्यांच्या बहिण प्रतिभा मगरे यांना देश-विदेशातून दूरध्वनी येऊ लागले. मात्र ते छायाचित्र गेल्या वर्षाचे असल्याचे खुद्द रितपूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘वेड्या मायेचे’ छायाचित्र वर्षभरानंतर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:35 PM