कुंदन पाटील, जळगाव : वाढलेले-विस्कटलेले-मळकटलेले-एकमेकांत गुरफटलेले केस धुतले गेले. मोकळे झाले. अंगावरील मळाचा थर निघून गेला आणि नंतर मनातील जाळेही हळूहळू उलगडू लागले. वाट हरविलेल्या मनोरुग्णांना जितक्या मायेने आंघोळ घातली गेली, तितक्याच मायेने घास भरविले गेले. वेले या लहानशा गावात माणुसकीची, ममत्वाची बहरलेली ही वेल... सध्या इथे रमजानच्या पवित्र पर्वात अक्षय्य आनंदाच्या तीर्थाची प्रचिती येत आहे. जात-धर्माचे व्रण पुसले गेले म्हणून...
वेले (चोपडा) गावातील मानव सेवा तिर्थ संस्थेचा हा सेवाभावच. खरे म्हणजे हे माणुसकीचे देऊळच, पण इथे कुठलीही मूर्ती नाही... अखंड सेवेच्या प्रवासात सहाशेवर भटक्या मनोरुग्णांना या संस्थेने हक्काचे घर आणि स्थैर्य दिले आहे. नरेंद्र रावण पाटील या हे या संस्थेचे संचालक. नरेंद्र हे स्वामी विवेकानंदांचेही नाव होते. सेवा-सत्कर्म हाच महान धर्म, हे सांगणाऱ्या विवेकानंदाचे अनुसरण करत भरकटलेल्या आयुष्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी या नरेंद्राने स्वत:ला एखाद्या यज्ञातील समिधेप्रमाणे समर्पित केले आहे. भटक्या, मनोरुग्णांच्या जखमा स्वत: धुताना त्यांना कधीही किळस येत नाही. त्यांच्या ममत्वाने भटके मनोरुग्ण स्थिरावतात. पंगतीतही शिस्तीत बसतात. जेवणात अर्थातच निस्वार्थ मानवताभावाचा स्वाद असतो...घासापरत तृप्तीची अनुभूतीही येते आणि मनोरुग्णांच्या मनातील जाळेही उलगडू लागते. भान येऊ लागते.
प्रार्थना सर्वमांगल्याची...इथल्या दैनंदिनीत कर्मकांड नाही, पूजा, प्रार्थनाही नाही, केवळ मानवता आहे. मनोरुग्णांना सुरुवातीला स्वत:चे नाव, गाव, जात, धर्म काही सांगता येत नाही. कोण हिंदू असेल, कोण मुस्लिम काही माहिती नसते. म्हणूनच पाटील यांनी देव दूर ठेवून जणू स्वत:च देवपण स्वीकारलेले आहे.
अनेक मनोरुग्णांना आता स्वत्वाबद्दल भान आलेले आहे. पाटील ज्या दीडशे जणांची सेवा करत आहेत, अशा या सर्व भरकटलेल्यांत सध्या १३ जण मुस्लिम आहेत. त्यांना आयुष्यभरच‘रमजान’पर्व पावले आहे. तर उपचारानंतर ते मानसिकदृष्ट्या सावरलेले साडेचारशेवर लोक आपापल्या घरी सुखरुपपणे पोहोच केले आहेत. या संस्थेने भाड्याने घेतलेल्या जागेत सध्या १५४ जण वास्तव्याला आहेत. मानसोपचार तज्ज्ञ डॉ.दिलीप महाजन उपचारासाठी स्वत: पुढे येतात. शासकीय मानसोपचार समितीकडून औषधं मिळतात. म्हणून इथं प्रत्येक जण मानसिक आजाराला हरवत जातात...
या आनंद विश्वाच्या सेवेतच दिवस घालवतो.अनेक जण मदत करतात. म्हणून प्रत्येकाच्या वेदना, दु:ख पुसता येतं.-नरेंद्र रावण पाटील, सेवेकरी.