१७ मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पिपळभैरव शिवारातील गट नबर ९८ / २ या शेतात सिमेंट पोल पडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे तक्रार केली. वादळामुळे पोल जमीनदोस्त झाला आहे. विद्युत तारा तुटून शेतात पडल्या आहेत. पेरणीचे दिवस असल्याने शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे या तारांमुळे खोळंबली आहेत. हे कोसळलेले पोल उभे करावेत व तारांची जोडणी करावी, यासाठी बहादरपूर येथील महावितरण कंपनीच्या अधिकारी व लाईनमनना माहिती तसेच निवेदन देण्यात आले. मात्र, महिना उलटत आला तरी महावितरण कंपनीचा एकही अधिकारी वा कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले नाहीत.
शेतकऱ्यांना पेरणी व लागवड करण्यास अडचणी येत असल्याने हे शेतकरी सामूहिक उपोषणाला बसणार आहेत. पेरणीसाठी उशीर झाला तर होणाऱ्या नुकसानीला महावितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असतील, असेही शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.