गल्लीबोळातील विक्रेत्यांनाही हटविले : मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाची कारवाई ; डीमार्टला बजावली नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. मात्र, तरीही विक्रेते, हॉकर्स ऐकत नसल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे. मंगळवारी हरिविठ्ठल नगरातील बाजार उठविल्यानंतरही बुधवारी पिंप्राळा बाजारात विक्रेत्यांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. मात्र, मनपाच्या पथकाने दुपारी ३ वाजताच बाजाराच्या ठिकाणी धडक देत, हा बाजार बसण्याचा आधीच हटविण्यात आला. तसेच याठिकाणी मास्क न लावणाऱ्या विक्रेत्यांवरही मनपाच्या पथकाने दंड केला आहे.
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने पिंप्राळा बाजारात धडक मारली. त्यावेळी काही विक्रेत्यांनी दुकाने थाटायला सुरुवात केली होती. मात्र,मनपा कर्मचारी पोहचल्यानंतर विक्रेत्यांनी माल जमा करून, या ठिकाणाहून पळ काढला. मनपा कर्मचाऱ्यांनीही विक्रेत्यांना दुकाने थाटू नये अशा सूचना केल्या. त्यामुळे अनेक विक्रेते आल्यापावली परत गेले. तर ग्रामीण भागातून आलेल्या विक्रेत्यांनी मात्र दादावाडी, खोटेनगर, पिंप्राळा भागातील गल्ल्यांमध्ये दुकाने थाटून व्यवसाय सुरू केला होता. या भागातही जाऊन मनपाच्या पथकाने भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.
डीमार्टला ५० हजारांचा दंड
प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करून, नियम धाब्यावर बसविल्याने मनपा प्रशासनाने मंगळवारी डीमार्ट सील केले. बुधवारी मनपा उपायुक्तांनी डीमार्ट व्यवस्थापनाला नोटीस बजावली असून, नियम मोडल्याप्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा २४ तासांच्या आत पाठविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी डीमार्ट व्यवस्थापनाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.