लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी पूर्ण झाली असून, जवळपास ७० हजार हेक्टर क्षेत्रावर हंगामपूर्व कापसाची लागवडदेखील करण्यात आली आहे. यंदा कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाकडून २६ लाख ५२ हजार ६०० पाकिटे कापसाच्या बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच १ लाख ३३ हजार मेट्रिक टन खतांचा साठादेखील कृषी विभागाकडून उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी दिली.
जिल्ह्यात जवळपास साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड केली जात असते. त्यात ७० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड जिल्ह्यात होत असते. यावर्षीदेखील जिल्ह्यात ५ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे, तर सोयाबीनच्या क्षेत्रातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अंदाजे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर हंगामपूर्व कापसाची लागवडदेखील करण्यात आली असून, जिल्ह्यात झालेल्या अवकाळी व मान्सूनपूर्व पावसामुळे हंगामपूर्व कापसाला फायदा होणार आहे.
आता प्रतीक्षा मान्सूनची
मे महिन्यातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागती पूर्ण केल्या असून, आता पेरणीसाठी बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. यावर्षी जिल्ह्यात चांगल्या पावसासह उत्पन्नदेखील चांगले यावे यासाठी शेतकरी वरुणराजाकडे प्रार्थना करत आहे. उडीद, मूग व सोयाबीनची लागवड जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या व जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यातच केली जात असते. जिल्ह्यात १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. जूनच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात जिल्ह्यात चांगल्या प्रकारे मान्सून सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच शेतकर्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असेही आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा व तालुकास्तरावर १६ भरारी पथकांची स्थापना
कोविड पार्श्वभूमीवर सर्व निविष्ठांची सुलभ वाहतूक आणि पुरवठा करण्यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवणे, बियाणे खते व कीटकनाशके यांची गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे तत्काळ निराकरण करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यावर्षी गुणवत्ता नियंत्रण कार्यवाहीसाठी निरीक्षकनिहाय व महिनानिहाय नियोजन केलेले आहे. जिल्ह्यात ११५२ बियाणांचे नमुने, ६७५ खतांचे नमुने व ३९५ कीटकनाशकांचे नमुने काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील बियाणे खते व कीटकनाशके उत्पादन स्थळ व साठवणूक स्थळ तपासणी तसेच जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील उत्पादकांचे साठवणूक स्थळ तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
- कापसासाठी बियाणे - २६ लाख ५२ हजार ६०० पाकिटे
-१ लाख ३३ हजार मेट्रिक टन खतांचा साठा
- ११ हजार ९४५ मेट्रिक टन खतांचा बफर स्टॉक
- सोयाबीनसाठी ७ हजार ५०० बियाणांचे नियोजन