भारतीय संस्कृतीची विविधता आणि वैदिक तसेच लोकायत अशा परंपरांची संमिश्रता सण-उत्सवातून प्रतीत होते. निसर्ग आणि मानवाची आदिमाता यांच्या अनुभव सृष्टीतून बदलत्या हवामान, ऋतू आणि निसर्गचक्राच्या सान्निध्यातील जीवसृष्टीच्या आंतरसंबंधांचा ताना-बाना म्हणजे बाराही महिन्यात साजरे होणारे कृषीवलांचे सण उत्सव असा हा प्राचीन संदर्भ असतो. गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातला शुभमुहूर्ताचा नववर्षारंभ ठरतो. तसाच कृषी संस्कृतीत ‘आखाजी’ (अक्षय्यतृतीया) ही ‘सालदार’ या कृषीकर्मीयांच्या वर्षाची सुरुवात ठरते. स्त्री मानसात चैत्रात आलेल्या गौरीची स्थापना आणि वैशाखात शुद्ध तृतीयेला विसजर्नाची सांगता करण्याची ‘गवराई’ पूजनेची परंपरा आगळीवेगळी ठरते. निसर्गातील बदलाचे आणि वसंतऋतूच्या संदर्भातले लोकमानस आणि शेतीमातीच्या मशागतीतून येणा:या काळातील मृगनक्षत्राच्या चाहुलीचे हे ऋतुसंभाराचे श्रद्धाशील कालचक्र ठरते. लोकपरंपरेतील आखाजीचे पितरांचे श्राद्ध, घागर भरणे, सांजो:या, गुण्या-पापडय़ा आणि आमरसासह कुरडई-पापडाच्या तळणाच्या लोकान्नाचा आस्वाद घेऊन गवराईच्या निरोपाची सांगता करण्याची ही लोकश्रद्धा असते. काही गावची ग्रामदेवतांची वार्षिक उत्सवानिमित्त ‘बारागाडय़ा’ ओढण्याची भगत-भोप्यांची ही यात्रारूपी ग्रामीण लोकोत्सवाची आराध्यपूजा असते. अक्षय्यतृतीया सणाच्या संदर्भातील साडेतीन मुहूर्तातील एक महत्त्वाचा शुभारंभाचा मुहूर्तही लोकजीवनात प्रचलित आहे. ‘आखाजी’ या सणाला असे बहुआयामी विविध उपयोजित आणि भावनिक संदर्भ लक्षात घ्यावे लागतात.
कृषी संस्कृतीचे नियोजन; लोकोत्सवाचे आयोजन ‘अक्षय्यतृतीया’
By admin | Published: April 28, 2017 5:41 PM
भारतीय संस्कृतीची विविधता आणि वैदिक तसेच लोकायत अशा परंपरांची संमिश्रता सण-उत्सवातून प्रतीत होते.
कृषीवलांची ‘आखाजी’ जमिनीच्या मशागतीसह पुढील हंगामाचे नियोजन आणि नांगरणे, वखरणे, सपाटीकरण तसेच खतासह सफाईचे कार्य आरंभणे असते. या वेळी ‘सालदार’ (कामगार) या मजुरीवर्गातील कृषिकार्य कुशल माणसाची वर्षभराची नेमणूक करण्याची रूढ परंपरा आहे. नव्या युगात तिची अवस्था आता शोचनीय होत चालली आहे. तरुण, उमदा, अनुभवी, कृषी कौशल्य गुणसंपन्न ‘सालदार’ त्याच्या वार्षिक मेहनतान्यासह कामास ठेवणे. त्याला अक्षय्यतृतीयेला गोड जेवण, एक धोतरजोडी कपडे देऊन करारबद्ध करणे. परंपरेनुसार वडिलांच्या वारसा हक्काने मिळालेल्या शेतीची जपणूक करणे. लाल घागर सजवून ती पाण्याने पवित्र जलाधिष्ठित करणे. तिच्यावर आंबा, पापड, सांजोरी इ.नैवेद्य ठेवणे. नैतिकता आणि लोकश्रद्धेच्या रूपाने पुढील वर्षाच्या हंगामासाठी नवचेतना जपणे, नवारंभातून नव्या सालदाराच्या स्वागतासह त्याला हक्क-कर्तव्याची जाण करून देणे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात हे मौखिक आचार-विचारांचे व्यावहारिक श्रद्धाशील गणित आता पार बदलते आहे. कृषी संस्कृतीत झालेले बदल जागतिकीकरणाच्या प्रभावात मारक आणि तारक असे दोन्ही अवस्थेत सापडतात. संभ्रमात पडलेल्या कृषीवल मात्र परंपरा जपताना काही अनौपचारिक प्रथा- रूढी तसेच चालींना पुढे चालू ठेवतो आहे. आता सालदारकीची शेती बुडीत निघाली असून कृषी व्यवस्था परिवर्तनशील झालेली आहे. त्यामुळे आखाजीच्या सणाचे महत्त्व, उद्देश आणि भूमिका बदलताना दिसते आहे.
नववधूला पूर्ण स्त्री बनवण्यासाठी सुरुवातीला तिला सासर- माहेर या द्वंद्वांतून भावनिक जागरण करण्यासाठी दिवाळी- आखाजी या दोन सणांचे महत्त्व लोकमानसात जोपासले गेले. पहिल्या दिवाळीनंतर सहा महिन्यांनी येणारी त्या युवतीची पहिली ‘आखाजी’ खूप महत्त्वाची असते. माहेरपणाचा मायेचा ओलावा जपताना भूतकालीन बालपणीच्या मैत्रिणींचा मेळा, गवराईची गाणी, आखाजीचा झोका, गोडधोड जेवण आणि आमरसाची मेजवानी या आनंदात रमण्याची स्त्री मनाची अवस्था आखाजीमुळे प्राप्त होते. गवराईची स्थापना, तिची विधीपूजा, गाणी आणि खेळ यांची परंपरा, रंजन आणि करमणूक इत्यादींचा संमिश्र आविष्कार असते आखाजी!
चैत्र वैशाखाचं ऊन माय वैशाखाचं
ऊन।
खडकं तपून झाले लाल व माय
तपून झाले लाल।
गवराई माय सावलीनं तू चाल वं
माय सावलीनं चाल।
तुह्या पायाले येतीन फोड वं माय
पायाले येतीन फोडं।
तुले काय कडीवर घेऊ वं माय
कडीवर घेऊ।
तुहे काय लाड करू वं माय लाल
लाडं करू।
चाल सोनारा घरी जाऊ वं माय गोठ
पाटल्या घालू।
गयात चितांग-पुतया घालू वं माय
नाकात नथनी घालू।
बाजूबंद- चिंचपेटी अन् पायात तोडे
घालू..।
आज काय आखाजीचा सन वं माय
आखाजीचा सन।
तुले काय सांजोरीच निवद वं माय
गुणीचा निवदं।
आमरसाच्या सोबत तुले पापड
कुरडईचा निवदं।
तुह्या वटीमंधी मायबाई खोबरं
खारकीचा निवदं।।
अशी काही ‘गौराईची गाणी’ हा स्त्री मनातील आनंद सोहळा ठरतो. लाकडाची गौर सुतार दादाकडून करून आणायची. तिला हळद लावून, डाऊ बांधून सजवायची. शेंगांच्या माळा, खोबरं, भोपळा गंगाफळाच्या बियांचे हार, होळीसाठी असलेला साखरेचा मोठय़ा पुतळ्यांचा हार, सांजोरीचा हार, दागदागिने अशी गौर सजलेली. तिच्या रूपाने ऐहिक जीवनात स्त्री मनात जे गूढ- सुख समृद्धीच्या प्राप्तीचे विचार दडलेले, त्यांना वाट करून देऊन, ते सुख असे भावनिकरीत्या प्राप्त करण्याची ही मनीषा आढळते.
-प्राचार्य डॉ. किसन पाटील,
जळगाव