संकेत पाटील यांनी केव्हीपीवाय परीक्षेत देशात १२० वा क्रमांक पटकावला असून आयआयटी जेईई परीक्षेत ९९.८७% गुण प्राप्त केले आहेत तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेत ६६५ गुण मिळवले आहेत. या विशेष यशाबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर जळगावचे संयुक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने, जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त कपिल पवार , संकेतचे वडील वामन पाटील, दृष्टी फाऊंडेशनच्या संचालिका प्रतिभा पाटील , नोबेल फाऊंडेशनचे संचालक जयदीप पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना संकेत पाटील म्हणाले की, कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वात आधी त्या परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या, आवश्यक संदर्भ पुस्तके अभ्यासायला सुरुवात करा, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा. यासोबतच गुणवत्तेचे मार्गदर्शन आवश्यक आहे. विज्ञान हा विषय पूर्णपणे संकल्पनांवर आधारित आहे. त्यामुळे घोकंपट्टी न करता संकल्पना समजून घेण्यावर भर द्या .राष्ट्रीय स्तरावरील कोणतीही परीक्षा अल्पावधीतच या अभ्यासात उत्तीर्ण होणे अवघड आहे म्हणून दहावीपासूनच या परीक्षांची तयारी करणे जास्त हिताचे ठरेल.
याप्रसंगी आय आर एस विशाल मकवाने मार्गदर्शन करताना म्हणाले की, आताच्या पिढीसाठी शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत .तंत्रज्ञानाचे महाजाल हाताच्या तळव्यावर उपस्थित आहे. मात्र नवीन पिढी ज्ञाना ऐवजी मनोरंजनात गुरफटलेली आहे, यातून बाहेर पडावे लागेल. सध्याच्या काळात बालसंस्कार पेक्षा पालक संस्कार जास्त गरजेचे आहेत. उपायुक्त कपिल पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी पालकांचा आधार महत्त्वाचा असतो मुलांचे मोठे करिअर करण्यासाठी पालकांनी ही आधुनिक होणे गरजेचे आहे. प्रास्ताविक जयदीप पाटील यांनी केले. यावेळी नवोदय निर्माण संस्थेचे संस्थापक गौरव पाटील यांना युवा चेतना पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले . हर्षल ठाकूर सुनील न्याती यांनी मनोगत व्यक्त केले. देवलसिंग पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : संकेत पाटील यांचा सत्कार करताना संयुक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने सोबत जयदीप पाटील, कपिल पवार ,वामन पाटील प्रतिभा पाटील.