जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ओपीडीवरील कक्ष क्रमांक ३०० मध्ये कोरोना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. कक्षाच्या बाहेर नोंदणी, प्रतीक्षालय, ॲपवर तपासणी, लसीकरण आणि निरीक्षक कक्ष असे नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. एका मोठ्या कक्षात पडदे टाकून प्रतीक्षालय आणि निरीक्षण कक्ष बनविण्यात आले आहे.
निरीक्षण कक्षात दोन-दोन फुटांचे अंतर टाकून किमान २५ लोक एकावेळी बसतील अशी व्यवस्था आहे. याठिकाणी नोडल अधिकारी म्हणून प्रशासकीय अधिकारी नेत्रतज्ञ डॉ. यु. बी. तासखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. आर. जयकर, पीएचएन जयश्री वानखेडे, अर्चना धिमटे, नोंदणीसाठी बापूसाहेब पाटील, ईशान पाटील, प्रदीप बाविस्कर, ब्रदर संपत मलाड, सुरक्षारक्षक अभिषेक पवार, कल्पेश शिंपी अशी पूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. याची स्वच्छता करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. अधिकारी, कर्मचारी नियोजन करीत होते. अधिकाऱ्यांनी या कक्षाची पाहणी केली. लसीकरणानंतर मागील बाजूने बाहेर पडायचे आहे.
यांचे निरीक्षण
वैद्यकीय अधिकारी डॉ. डॅनिअल साजी यांच्या निरीक्षणाखाली लसीकरणानंतर लाभार्थी राहणार आहे. या ठिकाणी दोन बेड, ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली आहे.