पाळधी, ता.जामनेर : पाळधीसह परिसरात वृक्षलागवडीसाठी शासनामार्फत रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र, मिळालेल्या रोपांमध्ये ठेकेदारामार्फत बनवाबनवी केली जात असल्याचा प्रकार ८ जुलै रोजी पाळधी येथे उघडकीस आला आहे. हाच प्रकार सोनाळे, दोदवाडे, शेरी व लोंढरी, एकुलतीसह तालुक्यात बहुतांश ठिकाणी पाहायला मिळाला.शासनामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला ३२०० रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत ३२०० रोपे वाटप करण्यात येत आहेत. परंतु हे फक्त कागदावरच असल्याचे जाणवत आहे. प्रत्यक्षात फारच कमी रोपे मिळत असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडून प्राप्त होत आहेत. सोनाळे येथे सरपंचपती रवींद्र पाटील, संभाजी पाटील, संदीप पाटील, पवीण कापडे, योगेश गुरव, रामा लोहार यांनी रोपांची मोजणी केली. त्या ठिकाणी ६२१ रोपे प्राप्त झाली. तर दोदवाडे येथे १०८० रोपे मिळाली. परंतु दोन्ही ठिकाणी पोहोचपावती मात्र ३२०० रोपांची देण्यात आली. प्राप्त झालेली रोपेसुद्धा फारच लहान आहेत तर काही निरुपयोगी असल्याचा सूर ग्रामस्थांमधून निघत आहे. यावरून झाडे लागवडीचा प्रकार केवळ कागदावरच होत असल्याचे निदर्शनास येत आहे.वृक्षलागवडीच्या मोहिमेत होत असलेली बनवाबनवी थांबवावी. केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी नव्हे तर वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणासाठी असे प्रकार घडू नयेत. एकीकडे वृक्षलागवडीसाठी शासनाकडून मोठ्या स्वरूपात मोहीम सुरू असताना असा प्रकार घडणे चुकीचे आहे. ग्रामपातळीवर ग्रमस्थ, शालेय विद्यार्थी वृक्षलागवडीसाठी उत्सुक आहेत. मात्र, शासनाकडून तिपटीने कमी रोपे मिळत असतील तर संकल्पपूर्ती होणे अशक्य आहे. अनेक समाजसेवी संस्थांकडून तसेच वैयक्तिक खर्चाने रोपे विकत घेऊन लागवड करता येऊ शकते. पण, ग्रामीण भागात शेतक-यांकडे मोठे आर्थिक संकट आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देऊन प्रत्येक गावात ठरावीक प्रमाणात आणि वेळेत रोपे उपलब्ध करून द्यावीत, अशा आशयाच्या प्रतिक्रिया ग्रमस्थांनी व्यक्त केल्या.