कासोदा, ता.एरंडोल : सध्या सूर्य आग ओकत आहे. सुखवस्तू घरातील लोक कुलर,एअरकंडीशनमधून घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत, पण ४५ अंशाच्या तापमानात भर उन्हात झाडांना पाणी दिल्याशिवाय कासोद्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आजही एक दिवसही जात नाही, विशेष हे की, या गावात गेली कित्येक वर्षे भीषण पाणी टंचाई आहे.ग्रा.पं. कार्यालयाजवळील स्मशानभूमीत व रस्त्यालगत अतिशय खडकाळ जमीनीवर ग्रा.पं.तर्फे दोन वर्षापूर्वी वृक्षारोपण करण्यात आले आहे.या सुमारे ३० च्यावर रोपांना जगवण्याची जबाबदारी ग्रा.पं.चे सफाई निरीक्षक मधुकर जुलाल ठाकूर या कर्मचाºयाने उचलली आहे.हा कर्मचारी दररोज न चुकता या सर्व रोपांना दोन वर्षांपासून पाणी देत आहे. नळांना पाणी आले तर नळाचे,नाही आले तर जेथून कुठून मिळेल तेथून पाणी आणायचे पण रोपांना पाणी द्यायचे.आता ही झाडे दोन वर्ष वयाची झाली असून चांगली हिरवीगार व डेरेदार झाली . भर उन्हाळ्यात हिरवीगार झाडे पाहून येणाºया जाणाºयांना नेत्रसुख ही झाडे देऊन जातात,मन देखील उल्हासित करतात.पण या मागे दोन वर्षाची प्रचंड मेहनत या कर्मचाºयाची आहे. हा कर्मचारी गावात दवंडी देणे, राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रसिद्ध आहे. एरंडोल- भडगाव रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे.५० ते १०० वयाची झाडे कापली गेल्याने हा रस्ता भकास दिसत आहे. रस्त्याच्या कडेला मेहनतीने जगवलेली झाडे बहरत आहेत. रस्ता रुंदीकरणात ती जातील का अशी भीती नागरिकांना आहे.उन्हाळ्यात पाण्याचा ओलावा टिकून रहावा म्हणून सडके, कुजलेले व फेकून दिलेले गवत झाडांच्या बुंध्याजवळ दाबून देतो.यामुळे काही काळ ओलावा टिकून रहातो.मिळेल तेथून पाणी आणतो.झाडांना पाणी देतोच.सार्वजनिक उपक्रमात सहभागी होता येते हे भाग्य समजतो.-मधुकर ठाकूर, ग्रा.पं.कर्मचारी, कासोदा.
४५ अंशाच्यावरील तापमानात झाडे जगवली,कासोदा ग्रा.पं.कर्मचाऱ्याची जिद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 3:32 PM