लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाने वर्षभरात विविध उद्योगांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यात प्लास्टिक पुर्नवापर उद्योगही अडचणीत आला आहे. गेल्या वर्षभरात प्लास्टिक पुर्नवापर करून तयार केल्या जाणाऱ्या कच्च्या मालातही जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जळगाव शहरात प्लास्टिकचा पुर्नवापर करून त्यापासून चटई, खुर्च्यासह इतर वस्तु बनवण्याचा उद्योग मोठा आहे. या भाववाढीचा फटका शहरातील जवळपास १५० उद्योगांना बसला आहे.
कचरा म्हणून फेकले जाणारे प्लास्टिक गोळा करून त्यापासून रिसायकल प्लास्टिक ग्रॅन्युएल्स बनवले जातात. याच ग्रॅन्युएल्सचा वापर करून शहरातील १५० पेक्षा जास्त उद्योग विविध वस्तु बनवतात. देशभरातून कचरा म्हणून फेकलेले प्लास्टिक जळगाव शहरात येते आणि त्याचा कच्चा माल बनवला जातो. सध्या हाच कच्चा माल ३५ ते ५० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. त्यापासून प्लास्टिकची भांडी, खुर्च्या, पीव्हीसी पाईप आणि इतर वस्तु बनवल्या जातात. वर्षभरापुर्वी २० ते ३५ रुपये किलो दराने विकला जाणारे ग्रॅन्युअल्स आता महागले आहेत.
काय आहे प्लास्टिक रिसायकलींगचा व्यवसाय
कचरा म्हणून फेकले जाणारे प्लास्टिक गोळा केले जाते. त्यापासून विशिष्ठ प्रकाराचे प्लास्टिकचे दाणे तयार केले जातात. त्याचा उपयोग करून प्लास्टिकच्या नव्या वस्तु तयार केल्या जातात. जळगाव शहरात १५० कारखान्यांमध्ये चटई, खुर्ची, पीव्हीसी पाईप, आदी वस्तु बनवल्या जातात.
संपुर्ण दक्षिण भारत, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे यातून गोळा झालेला प्लास्टिक कचरा जळगावला आणला जातो. याठिकाणी त्यावर प्रक्रिया केली जाते. प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण देखील कमी होण्यास मदत मिळते.
होत असलेला प्लास्टिकचा पुर्नवापर
७५० मेट्रीक टन प्रति दिवस
अवलंबून असलेले उद्योग
१५०
अवलंबून असलेले कामगार
२० हजार
अवलंबून असलेले उद्योग
चटई उद्योग, ड्रिप इरिेगेशन, रिसायकल ग्रॅन्युअल्स
कुठुन येतो प्लास्टिक कचरा
छत्तीसगड, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, दिल्ली, केरळ
कोट - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्लास्टिक पुर्नवापरातुन तयार होणाऱ्या कच्च्या मालाची किंमत वाढत आहे. गेल्या वर्षभरात ही किंमत ५० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या नव्या वस्तु देखील महागल्या आहेत. - विनोद बियाणी, उद्योजक