ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27 - शहरातील एका हॉटेलमध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळल्याच्या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासन विभागाने या हॉटेलमधून तांदळाचे नमुने घेतले आहे. दरम्यान, शहरात प्लास्टिकच्या तांदळाची विक्री होत असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत असल्याने दिवसभर हा चर्चेचा विषय होता. प्लास्टीकचा तांदूळ असणे शक्य नसल्याचे संबंधित हॉटेल व दुकान मालकाचे म्हणणे आहे.शहरातील एका हॉटेलमध्ये प्लास्टिकच्या तांदळाचा वापर होत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने या हॉटेलमधून तांदळाचे नमुने घेतले. हॉटेलमधून घेतलेले तांदळाचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून त्याचा महिनाभरात अहवाल येईल व त्यानंतर अधिक चौकशी केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या बाबत हॉटेलमध्ये चौकशी केली असता, नमुने घेतले असल्याचे हॉटेलच्या व्यवस्थापकांनी मान्य केले. मात्र प्लास्टिकचा तांदूळ जळगावात असणे शक्य नसल्याचेही सांगितले. शहरातील एका दुकानावर प्लास्टिक तांदूळ विक्री होत असल्याचे संदेश शनिवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते. या बाबत संबंधित दुकानमालकांकडे चौकशी केली असता ते म्हणाले, देशभरात कोठेच प्लास्टिक तांदूळ नाही. तो आमच्याकडे व शहरात असणे शक्य नाही. या बाबतचा लॅबचा अहवाल व इतर पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. यासंदर्भात आपण कायदेशीर बाजूने काम करीत असून या विषयी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार असल्याचेही दुकानमालकांनी सांगितले. आपणास बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचेही ते म्हणाले.