जळगाव : सर्पदशं झालेल्या व प्रकृती गंभीर असलेल्या एका दहा वर्षीय बालिकेला "स्किन ग्राफटींग" ही अद्यावत उपचार पद्धती वापरून ३४ दिवसांच्या उपचारानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले. मंगळवारी या मुलीला घरी सोडण्यात आले. सर्पदंश झाल्यानंतर प्लास्टीक सर्जरी करण्याचा हा शासकीय रुग्णालयात पहिलाच प्रयत्न असून तो यशस्वी झाला.
बऱ्हाणपूर येथील रहिवासी ही मुलगी घरी झोपलेली असताना सर्पदंश झाल्यामुळे स्नायू कमजोर होऊन श्वास थांबत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवलेले होते. तिला १८ जानेवारी रोजी जीएमसीत दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तत्काळ तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सूज वाढत असल्याने तिच्या शरीरावर पोटात रक्तस्राव होणे आदी दुष्परिणाम सुरु झाले होते. तिला अँटिबायोटिक आणि इतर औषधी सुरु झाली. दहाव्या दिवसानंतर शल्यचिकित्सा विभागाने "स्किन ड्राफ़टींग" हे अद्ययावत उपचार यशस्वीरीत्या केले. २२ फेब्रुवारी रोजी ३४ व्या दिवशी तिला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. प्रशांत देवरे, डॉ. मिलिंद चौधरी, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. गिरीश राणे, डॉ. बालाजी नाईक, डॉ. मानसा सी., डॉ. अतुल गाजरे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. जयश्री गिरी, डॉ. विश्वा भक्ता यांनी परिश्रम घेतले.
काय असते "स्किन ग्राफ़टींग"
ही एक प्रकारची प्लास्टीक सर्जरी असते. यात शरीराच्या जखम झालेल्या व ती जखम भरत नसलेल्या भागावर अन्य अवयवाची कातडी काढून ती जखमेच्या ठिकाणी लावली जाते. जळालेल्या, मधुमेहाच्या किंवा अपघातातील जखमी रुग्णांवर या प्रकारे साधारणत: उपचार केले जातात. या मुलीला साप चावलेल्या ठिकाणी विषामुळे तेवढा भाग चिघळला होता. शिवाय नसांनाही गंभीर इजा होत्या. त्यामुळे मांडिची काही कातडी काढून पायाला लावून ही जखम भरण्यात आली.