जळगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गेल्या आठवडाभरापासून प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या तीन पथकांनी वेगवेगळ्या भागात जाऊन मोहीम हाती घेतली. यामध्ये एकूण नऊ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, यामध्ये फुले मार्केट भागातील पाच, तर गणेश कॉलनी चौक परिसरातील चार विक्रेत्यांचा समावेश आहे. या सर्व विक्रेत्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
सुभाष चौकात अतिक्रमणविराेधी कारवाई
जळगाव - महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी सुभाष चौक भागातील सात अनधिकृत हॉकर्सवर कारवाई केली. यासह नवीन बी. जे. मार्केट भागातील रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या काही गॅरेजवाल्यांवरही महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच गॅरेजचालकांना महापालिकेच्या प्रशासनाने आता शेवटची समयसीमा दिली असून, पुन्हा ऱस्त्यालगत व्यवसाय थाटल्यास साहित्य जप्त करून दुकाने सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.