ऑनलाईन लोकमत जळगाव,दि.9 - यात्रेनिमित्त आयोजित तमाशात सापाचा खेळ दाखविणा:या तमाशा मंडळाच्या मालकाला वन्यप्रेमी व वनविभागाच्या अधिका:यांनी छापा टाकून पकडले. तमाशा मालक अभिमन नामदेव बोरसे यांच्याविरोधात वन्यप्रेमींनी पोलिसात तक्रार दिली. भविष्यात तमाशातून सापांबाबत जनजागृती करण्याचे आश्वासन पोलिसांनी तमाशा मालकाकडून घेतले. पथराड (ता. धरणगाव) येथे मंगळवारी यात्रा भरली होती. यानिमित्त रात्री नामा-भीमा यांच्या तमाशाचे आयोजन करण्यात आले. लोकांना आकर्षित करण्यासाठी मालक अभिमन बोरसे यांनी विषारी समजल्या जाणा:या नागाचा खेळ दाखविण्यास सुरुवात केली. याचवेळी गावातील काही सर्पमित्रांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे व वासुदेव वाढे यांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर तासाभरात पाळधी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, वनपाल सुनील पाटील, वासुदेव वाढे, बाळकृष्ण देवरे व योगेश गालफाडे यांनी पथराड येथे जाऊन तमाशा सुरू असतानाच सापाला ताब्यात घेतले. त्याचे दात काढलेले आढळून आले. बुधवारी सकाळी बोरसे यांनी पाळधी पोलीस स्थानकात हजेरी लावल्यानंतर भविष्यात तमाशातून सापांबाबत जगजागृती करण्याचे आश्वासन घेण्यात आले.
तमाशात चाले खेळ सापाचा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 7:08 PM