लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून खेळाडूंच्या प्रशिक्षण आणि सरावाची वाताहत होत आहे. कधी सुरू तर कधी बंद अशा पद्धतीने कसा सराव करणार असा प्रश्न खेळाडू आणि प्रशिक्षकांनी उपस्थित केला आहे. शासनाने सर्व निर्बंध उठवले, त्यावेळी सर्व खेळांच्या संघटनांनी तयारी सुरु केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा खेळाडूंच्या सरावावर सकाळी ९ वाजेपर्यंतच आटोपण्याचे निर्बंध आले आहेत. त्यावर खेळाडू आणि प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात ७ जून पासून सर्व निर्बंध उठवण्यात आले होते. त्यानंतर राज्यात डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यासोबतच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा २५ जून रोजी राज्य शासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले आहेत. त्यात आता जळगाव जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात आऊट डोअर स्पोर्ट्स सकाळी ५ ते ९ यावेळेतच सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या सर्वच इनडोअर स्पोर्टस बंदच आहेत.
प्रशिक्षकांचीही अडचण
शहरात काही मोजक्या मैदानांवर विविध खेळांचा सराव वेगवेगळ्या वेळी केला जात होता. त्यामुळे मैदानांवर सराव करण्यासाठी विविध खेळांच्या प्रशिक्षकांनी आपापल्या वेळा निवडल्या होत्या. मात्र लॉकडाऊनच्या काळात हे सर्व सराव बंद राहिले. टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल यासारख्या काही निवडक खेळांचे सराव सध्या जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहेत. आता सकाळची वेळ प्रशासनाने दिल्याने बहुतेक खेळाडू दररोजच्या सरावाला मुकण्याची शक्यता आहे.
कोट -
आम्ही प्रशासनाने मुभा दिल्यावर सर्व खेळाडूंचे नियमीत दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण आणि सराव घेत होतो. त्यामुळे सर्व खेळाडूंना पुरेसा वेळ मिळत होता. आता पुन्हा सकाळी ९ वाजेची मर्यादा असल्याने कसा सराव करावा, याचे नियोजन सुरू आहे. - कृपालसिंह ठाकूर, टेनिस प्रशिक्षक
कोट - प्रशासनाने सकाळी ९ वाजेची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खेळाडूंना मर्यादीत सरावावरच समाधान मानावे लागत आहे. त्याशिवाय खेळाडूंनी सायंकाळच्या वेळी घरच्या घरीच तंदुरुस्तीसाठी व्यायाम करावे- प्रवीण पाटील, क्रीडा शिक्षक