सावखेडा : रावेर तालुक्यातील सातपुडा जंगलात असलेले आदिवासी गावे तिड्या अंधारमळी,मोहमांडली , निमड्या, गारखेडा हे रस्ते अतिशय खराब झाले असुन नागरिकांना दवाखाना व शासकीय कामी मोठे हाल सहन करीत या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. तिड्या, मोहमांली, अंधारमळी, निमड्या, गारखेडा रस्त्याची दयनीय अवस्था संबधित अधिकारी, पदाधिकारी यांना माहिती असल्यावरही जाणीवपुर्वक डोळेझाक करीत असल्याचे ग्रामस्थांकडुन बोलले जात आहे.या रस्त्यांची गेल्या तीन वर्षापासुन अतिशय दुरावस्था झाली असून हे रस्ते अपघातांना कारणीभुत ठरत आहेत. या रस्त्यांनी प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. वाहनधारक, प्रवासी त्रस्त झाले असून गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी दवाखान्यात जाताना या रस्त्यामुळे तर खूपच त्रास होतो. काही वेळा तर रस्त्यातच बाळंतपण होते. अशा वेळी रस्त्यात नवजात शिशुला जन्म देतांना बाळ किंवा मातेला आपल जीव गमवावा लागला आहे. यास जबाबदार कोण ? असा सवाल आदिवासी जनतेने उपस्थित केला आहे. सातपुडा भाग हा जंगलमय परिसर असून येथे नेहमी काही ना काही घटना घडतच असतात. जंगलातील प्राण्यांपासुन देखील या परिसरातील जनतेला जीवाला धोका असतो. एकूणच खडतर जीवन जगत असताना आवश्यक कामासाठी जाताना रस्ताही धड नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही समस्या मांडली असता संबंधित विभागाच्या अधिकारी, पदाधिकारी यांचेकडुन उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अमाचा आदिवासी भाग असल्यामुळे दुर्लक्ष केले जात आहे, असे या भागातील ग्रामस्थांनी सांगितले. या समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन संबधित गावांच्या रस्त्यांची व पुलांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी रास्त मागणी, तिड्या, अंधारमळी, मोहमांडी,निमड्या,गारखेडा गावाच्या नागरिकांनी केली आहे.
आदीवासी भागात रस्त्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 6:00 PM