जळगाव : गोळीबाराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर पोलीस ठाण्यात हजेरीसाठी आलेल्या विजय जयवंत शिंदे (रा. चौघुले प्लॉट) याच्यावर शस्त्रासह हल्ला करण्याचा कट सोमवारी शनी पेठ पोलिसांनी हाणून पाडला. पोलीस ठाण्याच्या बाहेरच दबा धरून असलेल्या नीलेश नरेश हंसकर (वय १८, रा. प्रजापतनगर) याला अटक करण्यात आली आहे, तर सोनू भगवान सारवान व विक्रम राजू सारवान (दोन्ही रा. गुरुनानकनगर) हे दोघे जण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. अटकेतील नीलेश याच्याकडून तलवार, चाकू, कटर व सुरा असे शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.
चौघुले प्लॉट येथे ११ एप्रिल २०२१ रोजी सारवान व शिंदे गटात हाणामारी होऊन गोळीबाराची घटना घडली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलिसांत आर्म ॲक्ट व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात संशयित असलेला विजय शिंदे याला न्यायालयाने जामीन मंजूर करताना शनी पेठ पोलीस ठाण्यात हजेरी सक्तीची केली आहे. त्यासाठी तो सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी आला होता. याचवेळी विरोधी गटातील नीलेश हंसकर, सोनू सारवान व विक्रम सारवान पोलीस ठाण्यात आले होते. विजय शिंदे हजेरी देऊन बाहेर पडल्यानंतर घराकडे जाण्यासाठी निघाला असता या तिघांनी त्याचा पाठलाग केला. याची माहिती पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांना मिळताच त्यांनी उपनिरीक्षक अमोल कवडे, सुरेश सपकाळे, सहायक फौजदार रवींद्र पाटील, अमोल विसपुते, गिरीश पाटील, गणेश गव्हाळे, अमित बाविस्कर, अभिजित सैदाणे, मुकुंद गंगावणे, राहुल घेटे, राहुल पाटील, अनिल कांबळे, विजय निकम यांच्या पथकाला तातडीने त्यांच्या मागावर पाठविले. हंसकरसह तिघे शिंदे याचा पाठलाग करीत होते, तर पोलीस या तिघांचा पाठलाग करीत होते. चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग होता. लेंडी नाल्यावर पोलिसांनी एकाच बुलेटवर जात असलेल्या नीलेश हंसकर याच्यासह सोनू सारवान व विक्रम सारवान यांना अडविले. यादरम्यान नीलेश हंसकर पोलिसांच्या हाती लागला.
सोनूच्या घरासमोर लपविली शस्त्रे
दरम्यान, नीलेश हंसकर याला पोलिसांनी फैलावर घेतले असता त्याने विजय शिंदे याच्यावर आज हल्ला करण्याचा कट रचल्याचे सांगितले. त्यासाठी सोनू सारवान याच्या घरासमोर डुकरे बांधण्याच्या जागेत तलवार, सुरा, चाकू व कटर आदी शस्त्रे लपविल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सोनू सारवान याचे घर गाठून एक तलवार, सुरा, चाकू व कटर असे साहित्य जप्त करण्यात आले. फरार असलेल्या सोनू सारवान व विक्रम सारवान याचाही पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद गंगावणे यांच्या फिर्यादीवरून शनी पेठ पोलीस ठाण्यात नीलेश हंसकर, सोनू सारवान, विक्रम सारवान या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिथावणी देणाऱ्या स्टेटसवरून उफाळला होता वाद
व्हाॅट्सॲपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवल्याने ११ एप्रिल २०२१ रोजी सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबाराची घटना घडली होती. यावेळी सारवान गटावर विजय शिंदे याने गोळीबार केला होता, यात विक्रम राजू सारवान याच्या कानाला गोळी चाटून गेली होती. याप्रकरणी परस्पर फिर्यादीवरून शनी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सर्व संशयित जामिनावर बाहेर आहेत. सोनू व विक्रम हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. नीलेशची झडती घेतली असता कमरेत चॉपर मिळून आला. दरम्यान, यातील एकाला अटक झालेली असली तरी धग कायम आहे.