जळगाव : बीएचआरमधील चुकीच्या कामांसाठी सनदी अधिकारी महावीर जैन यांच्या कार्यालयातच कट शिजत होता. त्यासाठी संस्थेतील कागदपत्रे जैन यांच्याकडे आणली जायची व तेथेच कंडारे, महावीर जैन व इतर बसून चुकीच्या कामांबाबत निर्णय घेत होते. लेखापरिक्षण सुरु असताना पत्रव्यवहार करुन जैन कंडारेला माहिती पुरवित असल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, ठेवीदारांच्या ठेवींच्या पावत्या गोळा करण्यासाठी कंडारेने एजंट नेमल्याचे देखील उघड झाले आहे. तपासात एका जणाचे नाव निष्पन्न झालेले आहे.
दरम्यान, जितेंद्र कंडारे, सुनील झंवर व महावीर जैन यांनी ठेवीदारांच्या एफडी वर्ग करुन जवळच्या कर्जदारांच्या फाईली निरंक केलेल्या आहेत. धरम सांखला याच्याबाबतीत पुरावा देखील पोलिसांना आढळून आलेला आहे. काही प्रकरणात साखला याने त्याच्याशी संबंधित नसलेल्या ठेवी विकत घेतल्याचे दाखविण्यात आले आहे, परंतु या ठेवीदारांना पूर्ण रक्कमच मिळालेली नाही. याबाबतच्या कागदपत्रांची विचारणा पोलिसांनी साखला याच्याकडे केलेली आहे, परंतु त्याने अद्यापपर्यंत काढून दिलेले नाही. त्यामुळे पोलीस आता थेट ठेवीदारापर्यंतच पोहचणार आहेत. या कामासाठी नेमके कोणते व किती एजंट नेमले होते, त्याचीही माहिती काढली जात आहे. दरम्यान, सोसायटीचा अधिकारी असलेला सुजीत वाणी याच्याकडून सोसायटीचा ईमेल आयडी प्राप्त झालेला आहे. परंतु त्याने त्याचा गोपनीय पासवर्ड तपासात सांगितलेला नाही. त्यामुळे या ईमेल आयडीतूनही तांत्रिक पुरावे व गोपनीय माहिती मिळू शकते. पारस ओसवाल याचीही संस्थेबाबत भूमिका संशयास्पद असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
पथक नगरहून रिकाम्या हाताने परतले
या गुन्ह्यातील मास्टरमाईंड जितेंद्र कंडारे हा अहमदनगरमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी त्याचा चालक कमलाकर कोळी याला घेऊन अहमदनगर गाठले असता तो तेथून निसटला होता. अहमदनगरमध्ये कंडारेचे जेथे जेथे वास्तव्य होते, तेथे पोलीस गेले, मात्र काहीही उपयोग झाला नाही. बनावट वेबसाईट तयार करणाऱ्या कुणाल शहा यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे, त्याच्या शोधासाठी एक पथक अहमदाबाद येथे गेले होते. पण तो देखील तेथून गायब झाल्याची माहिती प्राप्त झाली. तपासात आणखी आरोपी वाढू शकतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रत्येक जिल्ह्यात प्रांताधिकाऱ्यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती
बीएआर प्रकरणात ज्या ज्या जिल्ह्यात गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या ठिकाणी उपविभागीय दंडाधिकारी अर्थात प्रांताधिकाऱ्यांची या प्रकरणात सक्षम अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली होती. म्हणजे या गुन्ह्याचा तपास एकाचवेळी आर्थिक गुन्हे शाखेसोबत महसूल विभागाकडूनही सुरु झालेली आहे. या नियुक्त्या शासनाने २०१४ मध्येच केल्या होत्या.
चौकट
आज न्यायालयात दोषारोप ठेवण्याचे कामकाज
बीएचआरमधील अपहार, फसवणूक प्रकरणात अटकेतील संशयित आरोपींवर दोषारोप ठेवण्याचे कामकाज आज जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात होणार आहे. अटकेतील आरोपींना कारागृहातूनच व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे हजर केले जाणार आहे.