मनपा स्थायी समिती सभेत निर्णय; मक्तेदाराकडून २४ मजूर पुरविण्यास मंजूरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- मालमत्ता करापोटी गेल्या काही वर्षांपासून थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना वारंवार नोटीस बजावून देखील थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाई म्हणून नळ संयोजन खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी मक्तेदारामार्फत २६ दिवसांसाठी २४ मजूर पुरविण्याच्या ठरावाला सोमवारी झालेल्या मनपा स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
मनपा स्थायी समितीची सभा सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्यप्रणालीव्दारे घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त सतीष कुलकर्णी, अप्पर आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. प्रभाग क्र. १ ते ४ मधील थकबाकीदार मिळकतधारकांकडील नळ संयोजन खंडित करण्यासाठी मक्तेदाराकडून २६ दिवस मजूर पुरविण्यात येणार्या ३ लाख ४० हजार ८० रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.अतिक्र मण निर्मुलन विभागाला मिळणार २० कर्मचारी मनपाच्या अतिक्रमण विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी होणार्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाकडील २० कर्मचारी दोन महिन्यांसाठी अतिक्रमण विभागाला देण्याबाबतचा निर्णय स्थायी समिती सभेत घेण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाकरीता कंत्राटी तत्वावर पवार यांची नियुक्ती स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०-२१ करीता महेंद्र पवार यांची कंत्राटी तत्वावर शहर समन्वयक म्हणून सहा महिन्यांकरीता तात्पुरती नियुक्ती करण्यात आली असून, त्यासाठी येणार्या २ लाख १० हजार खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विषय पत्रिकेवरील नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.