अमळनेर, जि.जळगाव : कविता म्हणजे व्यक्त होणं होय, दु:खाला रूप देणे म्हणजेच कविता होय, असे उदगार प्रसिद्ध कवी अशोक कोतवाल यांनी येथील मराठी वाङ््मय मंडळाच्या ‘पाऊस कवितेतला’ या जिल्हास्तरीय कविसंमेलनात काढले.येथील मराठी वाङ््मय मंडळ व प्रा.र.का.केले सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने काव्यसंमेलन रविवारी सकाळी नांदेडकर सभागृहात पार पडले. या वेळी जिल्ह्यातील कवींच्या श्रावणसरींनी रसिक चिंब झाले. मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, डॉ.सुहास देशमाने, कार्यवाह रमेश पवार, प्रा.प्र.ज.जोशी, नरेंद्र निकुंभ व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.प्रमुख अतिथी डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी बोलताना सांगितले, अमळनेर शहरात राहत असताना मी घडत गेलो. साहित्यिक झालो, ही अमळनेरची देणगी असल्याचे सांगत त्यांनी वस्ती आणि मौहला ही कविता सादर केली. त्यातून त्यांनी गावगड्यातील बालपण आणि हिंदू मुस्लीम ऐक्य याविषयी वर्णन ऐकवले.जळगावच्या डॉ.संगीता म्हसकर यांनी प्रेम निसर्ग यावर आधारित ‘पुन्हा हा चंद्र जागावा’, कधी फुलात रंगले कधी डावात न्हाले या दोन गझल सादर केल्या.धरणगावचे बी.एन.चौधरी यांनी आठवणी दंगलीच्या या कवितेतून दंगलीचे वास्तव उभे केले, तर श्रावण या कवितेतून सृष्टीचे वर्णन सादर केले. जळगावच्या माया धुप्पड यांनी माझ्या पाऊस फुला....रे तुझ्यासाठी माझ्या काळजात झुलतो झुला, देशभक्तीपर कविता भारत माझा देश ही कविता सादर केली. मिलिंद चौधरी यांनी कवितेतून खंत व्यक्त केली.भडगाव येथील रमेश धनगर यांनी पावसाची झडप आणि ग्रामीण जीवनावर आधारित कविता सादर केल्या.पाचोरा येथील कृपेश महाजन यांनी पावसाची कविता, डेथ आॅफ सोल या कवितेतून समाजाचे वास्तव यावर प्रकाश टाकला. प्रा.डॉ.रमेश माने यांनी विठ्ठलाचा अभंग यातून पेरूनिया घाम उगला दुष्काळ ही कविता सादर केली, तर सुशिक्षित बेरोजगारांचे अभंग यातून सुशिक्षित बेरोजगारांचे मनोगत व्यक्त केले.अमळनेरचे कवी रमेश पवार डिजिटल युग या कवितेतून पाण्याचे महत्व विशद करणारी कविता सादर केले. तुला कसं सांगू माझ्या देशा ही निर्भया गँगरेपवर आधारित कविता सादर केली.काव्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक कोतवाल यांनी पंढरपूर आणि वारकरी यांची श्रद्धा व्यक्त करणारी कविता सादर केली. सूत्रसंचालन रमेश पवार यांनी, तर आभार नरेंद्र निकुंभ यांनी मानले.
दु:खाला रूप देणे म्हणजेच कविता होय- कवी अशोक कोतवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 4:41 PM