भडगाव, जि.जळगाव : कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार जोपर्यंत अनुभव आपल्या मनाशी भेटत नाही तोपर्यंत आपली कविता दुसऱ्याच्या मनाला भिडत नाही. कविता कशी सुचली हे सांगत बसणारे कवी बहुदा कवितेच्या मूळापर्यंत पोहचलेले नसतात. तो त्यांचा उथळ अनुभव असतो. कविता ही आतून आलेली असावी, असे प्रतिपादन साहित्य संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य कवी रमेश पवार यांनी व्यक्त केले.ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा भडगावच्या प्रथम वर्धापन दिन सोहळा व कविसंमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय सदस्य तथा मसाप चाळीसगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप यांनी केले.यावेळी विश्वस्त अध्यक्ष सुनील पाटील, प्रतापराव पाटील, शिवनारायण जाधव गायकवाड, निमंत्रित कवी विष्णू थोरे, हास्य कवी प्रमोद अंबडकर, सुप्रसिद्ध कवी कृपेश महाजन, सिनेट सदस्य दिनेश नाईक, नरेंद्र निकुंभ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.प्राचार्य जगताप यांनी शाखेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच ज्ञानातून पैसा व पैशातून ज्ञान व मनोरंजन समाजासाठी उपलब्ध करून द्या, असे आवाहन शाखेस केले. भडगावला मोठी सांस्कृतिक परंपरा असून या परंपरेत मसाप शाखेचे योगदान असावे, असे मला नेहमीच वाटत होते आणि म्हणून भडगावी शाखा मिळावा म्हणून आपण आग्रह धरला होता, असे त्यांनी सांगितले.विश्वस्त अध्यक्ष सुनील पाटील यांनी कवी दिनकर यांची हिंदी रचना सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.यावेळी कवी विष्णू थोरे यांनी 'वेदनेच्या विहिरीचा बाई तळ लयी खोलं, दु:ख सावळून येते मुखी डोळ्यामधी वंलं' या कवितेने अंतर्मुख केले, तर हास्य कवी प्रमोद अंबडकर यांनी माय म्हणे बाबू तु लगीन कधी करतं, दोन तीन वर्षात तुही ढेरी येईल वरतं' या वºहाडी कवितेतून प्रेक्षकांना हसवले. पोरीचा बाप हो तिरपा व्हता डोया, आन ताटं सोडून जमिनीवर वाढत जाये पोया,' अशा विनोदी कविता सादर केल्या. शाहीर शिवाजीराव पाटील, कवी सुनील गायकवाड, सीमा पाटील, लताबाई पाटील, बालकवी राजेश पाटील यांनीही आपल्या कविता सादर केल्या. काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.रमेश माने यांनी केले.विविध क्षेत्रातील यशवंतांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यात शाहीर शिवाजीराव पाटील, प्रा.डॉ.रमेश माने, प्रा.डॉ.दीपक मराठे, प्रा.डॉ.दिनेश तांदळे, प्रा.डॉ.जे.डी.गोपाळ, प्रा.डॉ.बी.एस भालेराव, डॉ.प्रमोद पाटील, सुनील गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.सुरेश कोळी यांनी, तर सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले.यावेळी २०२१ मधील समीक्षा साहित्य संमेलन भडगाव शाखेला आपण देणार आहोत, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय सदस्य प्राचार्य तानसेन जगताप यांनी यावेळी घोषित केले, तर नगरदेवळ्याचे कवी गो.शि.म्हसकर यांच्या काव्यसंग्रहासाठी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ प्रयत्न करेल, असे आश्वासन कवी रमेश पवार यांनी दिले.
कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार- कवी रमेश पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:38 PM
कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार जोपर्यंत अनुभव आपल्या मनाशी भेटत नाही तोपर्यंत आपली कविता दुसऱ्याच्या मनाला भिडत नाही. कविता कशी सुचली हे सांगत बसणारे कवी बहुदा कवितेच्या मूळापर्यंत पोहचलेले नसतात. तो त्यांचा उथळ अनुभव असतो. कविता ही आतून आलेली असावी, असे प्रतिपादन साहित्य संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य कवी रमेश पवार यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देमसापच्या भडगाव शाखेचा वर्धापन दिन सोहळाभडगाव येथे कवि संमेलन रंगलेसमीक्षा साहित्य संमेलन भडगावी होणार