मनोज जोशी
पहूर जि. जळगाव : पती व पत्नीने स्वतः च्या शेतात विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. यात पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर आहे. ही घटना शनिवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास शेंदुर्णीत घडली.
विनोद अरूण गायकवाड - पाटील (३५) व भारती विनोद पाटील(३०, रा. श्रीकृष्ण नगर) अशी दाम्प्त्याची नावे आहेत. विनोद व भारती हे शनिवारी दुपारी शेतात गेले होते. दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास दोघांनी विष प्राशन केले. हा प्रकार परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी भारती मृतावस्थेत तर विनोद हा गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने पाचोरा येथे हलविण्यात आले.
दरम्यान, पती आपणास मारहाण करीत असल्याचा फोन भारती हिने शनिवारी दुपारी १२ वाजता आईला केला होता. आपल्या मुलीचा सासरच्यांनीच घातपात केल्याचा आरोपी भारतीचे वडील सुरेश पाटील व आई सुनीता पाटील (रा. सारनेर ता. सिल्लोड) यांनी पोलीस उपनिरीक्षक एस.पी.बनसोड यांच्याशी बोलताना केला.
गुन्हा दाखल करुन सासरच्या अटक करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका भारती हिच्या नातेवाईकांनी घेतली. याबाबत चौकशी करुन कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिले. या दाम्प्त्याच्या पश्चात दोन मुले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"