- विलास बारी जळगाव : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेतील वक्ते शरद विठ्ठल कोळी (रा. अर्धनारी, ता. माहोळ, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेण्याच्या कारणावरून जळगावात गुरुवारी ठाकरे गट व पोलीस आमनेसामने आले होते. पोलीस ठाण्यातच घोषणाबाजी करण्यात आली.
सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेत धरणगावात युवा सेनेचे विस्तारक शरद कोळी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविषयी वादग्रस्त व प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी कोळी यांना जिल्ह्यात भाषण करण्यावर बंदी आणली. तर दुसरीकडे धरणगावात त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. पोलीस दडपशाहीने कामकाज करीत असल्याचा आरोप करुन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सुषमा अंधारे, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गजानन मालपुरे यांच्यासह शिवसैनिक शरद कोळी यांच्यासोबत हॉटेल ते शहर पोलीस ठाणे चालत आले. रस्त्यावर पोलीस व सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.