लोकमत न्यूज नेटवर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा विशेष शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना अश्लील संदेश पाठविल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी पोलीस दलातील हवालदार नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) याला अटक केली आहे. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ज्या पोलिसांना अश्लील संदेश गेले, त्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा क्रमांक होता. त्यामुळे या महिलेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. याच महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून सायबर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वारुळे हे स्थानिक गुन्हे शाखेच्या इंटरसेप्शन विभागात कार्यरत आहेत. हा विभाग अतिशय गोपनीय समजला जातो. दाखल गुन्ह्यातील गुन्हेगारांचे लोकेशन, सीडीआर काढण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. वारुळे यांच्याकडे घरझडतीत २९ मोबाईल, १४ सिम कार्ड सापडल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. मात्र ज्या क्रमांकावरून अश्लील संदेश गेले ते सिम कार्ड मिळून आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. धरणगाव, अमळनेर व नाशिक येथे दाखल गुन्ह्यांमध्ये देखील वारुळे यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान, वारूळे हे अनेक वर्षापासून या शाखेत कार्यरत असल्याने पोलीस दलातील अंतर्गत वादातून वारुळे यांना या प्रकरणात गोवले जात असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील कुणाल पवार यांनी न्यायालयात केला.