२२ सीटीआर ५५
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - गेल्या वर्षभरापासून कामाला असलेल्या नोकराने मित्राच्या मदतीने बुधवारी मोहनकुमार जगाथानी (रा.देवनयागम, जि.सेलम, तामिळनाडू) या मालकाच्या घरात पन्नास लाखाची चोरी केली. ही रक्कम घेवून दोघं राजस्थानमध्ये फरार होत असताना शुक्रवारी पहाटे भादली गावाजवळ त्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टीसी बनून नवजीवन एक्सप्रेसमधून जेरबंद केले. दोघांकडून एकूण ३७ लाख ९७ हजार ७८० रूपये हस्तगत करण्यात आले आहे. मंगलराम आसूराम बिश्नोई (१९,रा. खडाली ता. गुडामालाणी, जि. वाडनोर राजस्थान) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर त्याच्या अल्पवयीन मित्राला सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोहनकुमार जगाथानी हे तामिळनाडू राज्यातील देवनयागम येथील रहिवासी आहेत. ते व्यवसायिक आहेत. त्यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून मंगलराम बिश्नोई हा तरूण कामाला होता. मंगलराम याने राजस्थान येथून आपल्या मित्राला बोलवून बुधवारी मालकाच्या घराल डल्ला मारला. मालक मोहनकुमार यांना घरात बांधून दोघांनी पन्नास लाख रूपयांची रोकड लांबविली. नंतर दोघांनी तेथून पोबारा केला. जगाथानी यांनी कशीबशी स्वत:ची सुटका केली. नंतर सेलम पोलीस ठाणे गाठले व नोकरांविरूध्द तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी लागलीच वायरलेसद्वारे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये चोरीची माहिती दिली.
पोलिसांनी शेगाव येथून सुरू केला प्रवास....
तामिळनाडूत मालकाच्या घरात डल्ला मारणारे दोन चोरटे राजस्थानकडे निघाले ही माहिती शेगाव पोलीस अधीक्षकांनी जळगाव पोलीस अधीक्षकांना गुरूवारी दिली. एलसीबीचे पोलीस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षकांनी पोलिसांचे पथम नेमले व हे पथक गुरूवारी रात्रीचं मलकापूर येथे पाहोचले. चोरटे चैन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमध्ये असल्याची खात्री होताचं, एलसीबीच्या पथकाने टीसी बनून शुक्रवारी पहाटे मलकापूर ते जळगाव प्रवास सुरू केला व प्रवाशांची तपासणी केली. अखेर भादली गावाजवळ रेल्वेत तपासणी करताना, दोन्ही चोरटे पोलिसांच्या हाती लागले. त्यांची कसून चौकशी केली असता, दोघांना बँगेत एकूण ३७ लाख ९७ हजार ७८० रूपये मिळून आले.
चोरीची कबूली
पथकाने दोघांची कसून चौकशी केली असता, एकाने मंगलराम बिश्नोई असे नाव सांगितले व तो गेल्या वर्षभरापासून मालकाकडे कामाला होता, अशी माहिती दिली. मालक व्यवसायाची रक्कम कुठे ठेवत होते ही माहिती असल्यामुळे मित्राच्या मदतीने चोरी केल्याचेही त्यांने कबुली दिली. तसेच अल्पवयीन मित्राला सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिक्षणासाठी केली चोरी...
मंगलराम याने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे तर त्याचा मित्र हा बारावीत आहे. घरात पैसे नाही, परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे घरात पैसा यावा व पुढील शिक्षण घेता यावे, म्हणून चोरी केल्याची माहिती दोघा मित्रांनी पोलिसांना चौकशीत दिली.
बनावट आधारकार्डद्वारे तिकिटाचे आरक्षण
ओळख पटू नये व नाव कळू नये यासाठी मंगलराम याने राजस्थानातील मित्राच्या मदतीने आधीच बनावट आधारकार्डद्वारे रेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण केले. मात्र, चोरट्यांनी लढविलेली शक्कल निकामी ठरली. पोलिसांनी दोघांना टीसीची वेशभूषा साकारत अटक केली.
सेलम पोलीस जळगावकडे रवाना
चोरट्यांना अटक केल्यानंतर जळगाव पोलिसांनी सेलम पोलिसांना संपर्क साधला व चोरट्यांना अटक केल्याची माहिती दिली. त्यानुसार दोघा चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी सेलम पोलीस हे जळगावसाठी रवाना झाले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, सुनिल दामोदरे, विनोद पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, मुरलीधर बारी आदींनी ही कारवाई केली आहे.