बीएचआर संबंधित कारवाईसाठी पुणे पोलिसांनी संपूर्ण गुप्तता पाळली होती. या प्रकरणी डेक्कन, पिपंरी आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडे ३ गुन्हे दाखल आहेत. दोन पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, २५ सहायक निरीक्षक आणि १०० पोलीस कर्मचारी असा पुणे, पिपंरी आणि ग्रामीण पोलिसांच्या या मोठ्या पथकाकडून शुक्रवारी सकाळीच शहरात १२ ठिकाणी एकाचवेळी हे छापे घालण्यात आले. त्यातून मिळालेल्या माहितीवरुन इतर ठिकाणी तसेच औरंगाबाद येथे झडत्या घेण्यात आला. तीन ट्रक कागदपत्रे घेऊन पथके पुण्याला गेले होते. या कागदपत्रांची छाननी सध्या सुरु आहे. त्यामध्ये ठेवीदारांच्या पावत्या, कर्जदारांचे शपथपत्रे, अनेक बनावट शिक्के असे साहित्य आहे. त्यातील कोणते बँकेने केलेली दस्तऐवज आहेत व कोणते आरोपींनी बेकायदेशीरपणे लोकांकडून करुन घेतलेली कागदपत्रे आहेत, ही कागदपत्रे लिलावामधील आहेत की तारण म्हणून घेतलेली आहेत, याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. तसेच अटक केलेल्या आरोपीचे जबाब नोंदवून घेण्याचे काम स्वतंत्र पथक करीत आहेत.या सर्व कागदपत्रांची छाननी करुन त्याचा पुरावा म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने आणखी काही दिवस लागणार आहेत.
झंवर, कंडारेची अटकपूर्वसाठी सुप्रीममध्ये धाव
झाडाझडती झाल्यापासून जितेंद्र कंडारे, सुनील झंवर हे बचावासाठी पळ काढत असून दिलासा मिळण्याची चिन्हे मावळल्याने त्यांनी अटकपूर्वसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती मंगळवारी मिळाली. अधिकृत माहिती मात्र मिळू शकली नाही. दरम्यान, याच भीतीने जिल्ह्यातील एका बड्या नेत्यानेही बारामतीत शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पवारांनी भेट टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात जितेंद्र कंडारे हा मुख्य सुत्रधार आहे. यातील सर्व व्यवहार व कागदपत्रांची त्याला पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे त्याचा व सुनील झवर याचा पोलिसाचे स्वतंत्र पथक शोध घेत आहे.