फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपींच्या बाजू सुरक्षित ठेवून चार्जशीट दाखल करण्यासाठी विलास सोनवणे या कॉन्स्टेबलने १९ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाने सापळा रचल्यानंतर तो त्या विभागाचे व्हॉइस रेकॉर्डर घेऊनच मार्च महिन्यापासून फरार झाला होता. विलास सोनवणे याला औरंगाबाद खंडपीठानेही अटकपूर्व जामीन नाकारला आहे. २७ रोजी जळगाव येथे अटक करण्यात आली होती. तो अमळनेर येथून सापळा यशस्वी होण्यापूर्वी पळाल्याने, त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता, म्हणून विलास सोनवणे यास अमळनेर येथील जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील ॲड.किशोर बागुल यांनी युक्तिवाद करताना बाजू मांडली की, आरोपी विलास याने पळविलेले व्हॉइस रेकॉर्डर, त्यातील सिम कार्ड, तसेच ज्या बुलेटवर तो पळाला होता, ती बुलेट आणि गुन्ह्यात वापरलेला मोबाइलही जप्त करणे बाकी आहे. साक्षीदारांचे जबाब बाकी असून, तो त्यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे, म्हणून त्यास पोलीस कोठडीची मागणी केली असता, न्या. राजीव पी. पांडे यांनी ३१ मेपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्हॉइस रेकॉर्डर पळविणाऱ्या पोलिसाला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:14 AM