लोकमत पाठपुरावा
जळगाव : शहर परिसर व महामार्गावरील विविध चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीने सर्वच जण त्रस्त झाले असून काशिनाथ लॉज चौकातील वाहतूक कोंडीविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाला जाग आली असली तरी मनपा अजूनही ढिम्मच असून चौका-चौकात अतिक्रमण कायम आहे.
शहरातील नेरी नाका, पुष्पलता बेंडाळे चौक यासह महामार्गावर अजिंठा चौफुली, काशिनाथ लॉज चौक, कालिंका माता मंदिर परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण वाढण्यासह रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतूक कोंडी होणे नित्याचे झाले आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून दररोजच्या डोकेदुखीमुळे अनेकांनी आपला येण्या-जाण्याचा मार्गच बदलविला आहे.
या समस्या असणाऱ्या चौकांपैकी मंगळवार, २२ डिसेंबर रोजी लोकमतने काशिनाथ लॉज चौकातील वाहतूक कोंडीविषयी सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत मंगळवारी या ठिकाणी खाजगी वेशातील दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.
मनपा अजूनही निद्रावस्थेत
वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकात व परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा आहे. काशिनाथ लॉज चौकातील समस्येविषयी पोलीस प्रशासनाला जाग आली असली तरी मनपा प्रशासन मात्र अजूनही झोपेत असल्याचे चित्र आहे. मनपाच्या ढिम्म कारभारामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच असून येथील अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून महामार्गाच्या बाजूला भाजीपाला विक्रेते, विविध वस्तूंच्या दुकाना थाटल्या जात आहे. यामुळे मोठ्या अपघाताची प्रतीक्षा मनपा करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.