जळगाव : घर घेऊन देण्याचे अमिष देवून महिला पोलीस कर्मचारी प्रतिभा रोहिदास पाटील यांना आठ लाखाचा गंडा घातल्याप्रकरणी तिचा पती विशाल मधुकर भट (रा.धुळे) यांच्यासह चार जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यातील एक आरोपी राकेश श्यामसुंदर चव्हाण यास जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता १८ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.काय आहे प्रकरण?यासंदर्भात जिल्हापेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या प्रतिभा रोहिदास पाटील (वय ३५) रा. बॉम्बे डाईंग पोलीस लाईन यांनी जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विशाल मधुकर भट रा. वाडिभोकर रोड, धुळे हा फिर्यादी पोलीस महिला कर्मचाऱ्याचा पती असून त्याने त्याचे मित्र संजय साहेबराव महाले, त्याची पत्नी सुवर्णा संजय महाले रा. खोडे मळा, भुजबळ फार्महाऊसजवळ निलकमल सोसायटी हाऊस नंबर ४ नाशिक, राकेश श्यामसुंदर चव्हाण रा. मुळ सोनवद, ता. धरणगाव ह.मु. गुजराल पेट्रोल पंपाजवळ, जळगाव यांच्याशी संगनमत करून फिर्यादीस घर घेण्याचे अमिष दाखवून वेळो वेळी रोखीने व धनादेशाद्वारे सुमारे ८ लाख रूपये घेतले.एका आरोपीस केली अटकजिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तपासाची चक्रे फिरवून चौघांपैकी एक आरोपी राकेश श्यामसुंदर चव्हाण यास शुक्रवारी सकाळी ९.५० वाजता अटक केली.दरम्यान, अटक केलेल्या राकेश चव्हाण याला शुक्रवारी सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. अन्य तीन आरोपींना अटक करण्यासाठी ते कोठे आहेत हे विचारण्यासाठी चव्हाण यांना तीन दिवस पोलीस कोठडी मिळावी तसेच दिलेले पैसेही आरोपींकडून हस्तगत करावयाचे आहेत,असा पोलिसांतर्फे न्यायालयात सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने अटक केलेल्या राकेश चव्हाण यास रविवारी १८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.स्वत:चे दागिने गहाण ठेऊन व कर्ज काढून घरासाठी उभा केला पैसाफिर्यादी महिला पोलीस कर्मचारी प्रतिभा पाटील यांनी स्वत:चे घर होईल म्हणून स्वत:चे दागिने गहाण ठेऊन तसेच खाजगी संस्थेतून कर्ज घेऊन पैसा उभा केला होता. मात्र त्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न अपूर्णच राहीले. संजय महाले व त्याची पत्नी सुवर्णा यांनी आमच्याकडे जागा आहे ती विकसीत करीत आहोत असे वेळोवेळी सांगितल्याची माहिती प्रतिभा पाटील यांनी जिल्हापेठ पोलिसांना दिली. त्या पैसे देत गेल्या मात्र हक्काचे घर न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
जळगावात पोलीस पत्नीला पतीसह चौघांकडून ८ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:53 PM