तोरनाळा जवळील पठारतांडा येथे शिर नसलेला मुलगा आणि महिला रस्त्यावर उलट्या पावली चालत असल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. पहूर पोलिसांनी देऊळगाव गुजरी येथील रहिवासी जमील शहा, गोपाल तवर व सतीश शिंदे यांना शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले आणि चौकशी करून सोडून दिले. पोलीस या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहत आहेत. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचाही अभ्यास या प्रकरणात सुरू आहे. व्हिडीओ बनविण्याचा उद्देश काय, याचा पोलीस शोध घेत आहेत. वेळप्रंसगी संबधित तिघांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. वरील तीनही जण गुरुवारी रात्री जळगावहून देऊळगाव गुजरीकडे जात होते. यादरम्यान तोरनाळा गावाच्या अलीकडे घाट चढल्यावर पठारतांडा फाटा आहे. या ठिकाणी वाहन उभे करून मोठा लाईट न लावता छोटा लाईट लावलेला दिसतो. वाहनात स्वतः गाणे म्हणून व्हिडीओ तयार केल्याचे दिसून आले. यादरम्यान मिक्सिंग करण्यात आले. या बाबी चौकशीदरम्यान संशयास्पद आढळल्या आहेत.
दरम्यान, हा व्हिडीओ मिक्सिंग करून कुणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचा जवाब संबधित तीनही जणांनी पोलिसांना लिहून दिला आहे.
कोट
या व्हायरल व्हिडीओबाबत सत्यता पडताळून पाहिली जात आहे. यासंदर्भात तीन संशयितांची चौकशी केली आहे. संशयास्पद आढळून आल्यावर तीनही जणांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येईल. जगात भूताटकी नाही. नागरिकांनी भयभीत होऊ नये.
- अरुण धनवडे, पोलीस निरीक्षक, पहूर.