जळगाव : राज्यात सत्ता स्थापनेबाबतच्या घडामोडी पाहता शहरात कुठेही गालबोट लागू नये व खबरदारी म्हणून रविवारी पोलिसांकडून शहरात पथसंचलन करण्यात आले. या संचलनात शस्त्रधारी रॅपीड अॅक्शन फोर्सचाही सहभाग होता.राज्यातील राजकीय घडामोडी पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शहरातून पथसंचलन करण्याचे आदेश सकाळीच जारी केले. त्यानुसार भुसावळ उपविभागाचे उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या नेतृत्वात सायंकाळी पाच वाजता शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. जिल्हा क्रिडा संकुल, कोर्ट चौक, नेहरु चौक, शनी पेठ, रथ चौक, सुभाष चौक, आठवडे बाजार, पांडे चौक, कंजरवाडा व तांबापुरा या भागातून संचलन झाल्यानंतर इच्छा देवी चौकात संचलन थांबविण्यात आले. तेथून सर्व अधिकारी, कर्मचारी आपआपल्या पोलीस ठाण्यात तर रॅपीड अॅक्शन फोर्स नियंत्रण कक्षात रवाना झाला.या संचलनात रॅपीड अॅक्शन फोर्सचे डेप्युटी कमाडंट रवी मिश्रा, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत शिरसाठ, शनी पेठचे विठ्ठल ससे, जिल्हा पेठचे अकबर पटेल, रामानंद नगरचे अनिल बडगुजर, शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक दिलीप पाटील, संदीप पाटील यांच्यासह २०० कर्मचारी, रॅपीड अॅक्शन फोर्सच ९० जवान व शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते.
सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 7:22 PM
राज्यात सत्ता स्थापनेबाबतच्या घडामोडी पाहता शहरात कुठेही गालबोट लागू नये व खबरदारी म्हणून रविवारी पोलिसांकडून शहरात पथसंचलन करण्यात आले. या संचलनात शस्त्रधारी रॅपीड अॅक्शन फोर्सचाही सहभाग होता.
ठळक मुद्दे रॅपिड अॅक्शन फोर्सचा सहभाग संवेदनशील भागात संचलन