जळगाव : हौस म्हणून दुचाकीवर १ क्रमांक टाकणे व पोलीस कारवाई होऊ नये म्हणून पोलीस असलेले स्टीकर चिटकविणे हॉटेल कारागिराला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी संशयावरुन दुचाकी अडविली असता हा प्रकार उघड झाला. निलेश निबांजी इंगळे (३६, रा.आसोदा,ता.जळगाव) याच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, निलेश इंगळे हा शहरातील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून कामाला आहे. गुरुवारी रात्री काम आटोपून १.२० वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन घरी जात असताना मानराज पार्क परिसरात गस्तीवर असलेल्या जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप आराक, पितांबर मोरे व शेखर पाटील यांनी इंगळे याला अडविले. त्याच्या दुचाकीवर असलेल्या क्रमांकावर (एम.एच. १० डी.सी. १) संशय आला. चौकशी केली असता या दुचाकीचा मुळ क्रमांक एम.एच.१९ डी.सी.८४५४ असल्याचे निष्पन्न झाले. पुढील बाजूने नंबर प्लेट नव्हती तर मागील बाजूने ठळक अक्षरात पोलिसाचे चिन्ह होते. चौकशी केल्यावर इंगळे याने नातेवाईक पोलीस असल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. कारवाईचा धाक दाखविल्यानंतर इंगळे याने हा क्रमांक हौस म्हणून टाकला तर पोलीस कारवाईपासून बचाव व्हावा म्हणून पोलिसाचा लोगो टाकल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी ही दुचाकी जप्त करुन पोलीस ठाण्यात आणली. निलेश इंगळे याच्या विरोधात शेखर पाटील यांच्या फिर्यादीवरुन कलम १७१, मोटार वाहन कायदा कलम ५१/७७, १३४ (६) तसेच १३० (३) १७७ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामीनपात्र गुन्हा असल्याने इंगळे याला नोटीस देवून सोडून देण्यात आले.
दुचाकीवर पोलीस चिन्ह व १ क्रमांक लावणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:53 PM