जळगाव : पोलीस अंमलदाराचे वृध्द आई, वडील व १२ वर्षाच्या भाच्याला घरातीलच बॅटने बेदम मारहाण करून कपाटातील रोख रक्कम व दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना शहराच्या उपनगरातील खेडी येथील श्रीकृष्ण नगरात रविवारी पहाटे साडेतीन वाजता घडली. या घरात प्रवेश करण्यापूर्वी चोरट्यांनी याच परिसरातील यमुना नगरात विजय सुखदेव चव्हाण यांच्या घरातून सुटकेस लांबविली तर गुरुदत्त नगरात योगेश भानुदास पाटील यांच्याकडेही असाच प्रयत्न केला, मात्र जागे झालेल्या पाटील यांनी दम भरून शिवीगाळ करताच त्यांनी तेथून पळ काढला. एकाच रात्री चार ठिकाणी झालेल्या या घटनांनी खेडी हादरली आहे.
नंदुरबार पोलीस दलात कार्यरत असलेले योगेश जगन्नाथ भोळे यांचे खेडी येथे गावाच्या बाहेर श्रीकृष्ण मंदिराजवळच दुमजली घर आहे. मोठा भाऊ विकास आर्मीमध्ये असून दोन्ही भाऊ नोकरीच्या ठिकाणी आहेत तर घरी वडील जगन्नाथ शंकर भोळे, आई सुशीलाबाई व मोठ्या भावाची पत्नी हर्षा, त्यांचा मुलगा जीवांश असे राहतात. शनिवारी सकाळी भाचा सिध्दांत अनिल दांडगे (१२) हा घरी आलेला होता. वृध्द दांपत्य व सिध्दांत एका खोलीत तर हर्षा व त्यांचा मुलगा दुसऱ्या खोलीत झोपलेले होते. पहाटे साडेतीन वाजता मागील लोखंडी गेटवरुन उडी घेऊन तीन जण आतमध्ये आले. टॉमीने दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
आवाज काढताच बॅटने हल्ला
या घटनेबाबत भोळे यांची सून हर्षा यांनी ‘लोकमत’ला सांगितल्यानुसार, घरात कुणी तरी आल्याची चाहूल लागल्याने सुशीलाबाई यांनी पतीला आवाज दिला. ते उठून दरवाजाजवळ आले असता चोरटे कपाटाच्या आड लपले. दरवाजा उघडा असल्याचे पाहून त्यांनी दरवाजा बंद केला आणि पुन्हा जागेवर जाऊन झोपले. नातू सिध्दांत याला चोरटे दिसल्याने त्याने आवाज काढला असता त्यातील एकाने दरवाजाच्या बाजूला ठेवलेली बॅट त्याच्या खांद्यावर मारली. धावून आलेल्या सुशीलाबाई यांच्या हातावर तर जगन्नाथ भोळे यांच्या डोक्यात बॅट घातली. रक्तबंबाळ झालेले भोळे जागेवरच बेशुध्द पडले. काही क्षणातच चोरट्यांनी सुशीलाबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढले व कपाटातील रोख रक्कम व दागिने घेऊन मागील दरवाजाने शेताच्या दिशेने पळ काढला.
साखरपुड्यात दागिने खरेदीची रक्कम नेली
पोलीस अंमलदार योगेश यांचा २५ फेब्रुवारी रोजी साखरपुडा होणार आहे. त्यासाठी स्वत: व वधूला दागिने खरेदी करायचे असल्याची ही रक्कम बँकेतून काढून कपाटात ठेवली होती. प्रथमदर्शीने ४० हजारांची रोकड सांगितली जात असली तरी सून हर्षा यांच्या अंदाजानुसार दोन लाखांच्यावरच रोकड असावी. त्याशिवाय कपाटात दागिने होते. सुशीलाबाई यांना दवाखान्यात हलविण्यात येत असताना त्यांनी सुनेला कपाटात काय शिल्लक आहे, असे बघायला सांगितले होते, त्यात काहीच शिल्लक नव्हते.