कुंदन पाटील, जळगाव: परवानगी व अधिकारी नसतानाही ‘एसी’चा वापर करणाऱ्या नाशिक विभागातील पोलीस अधिकाऱ्यांना यंदा उन्हाळाचा चांगलाच घाम फोडणार आहे. दालनात ‘एसी’ बसवून विजबिलापोटी जनतेच्या पैशाची उधळण करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने ‘एसी’ काढण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांनी दिले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी माहिती अधिकारात अर्ज केला होता. त्यानुसार कुठल्या दर्जाच्या अधिकाऱ्याला दालनात ‘एसी’ वापरायला परवानगी आहे, याचा तपशीलही मिळविला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांसह एकही वरिष्ठ अधिकाऱ्याला दालनात ‘एसी’ वापरायचा अधिकार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार गुप्ता यांनी ‘एसी’चा सर्रास वापर करुन लाखोंच्या वीजबिलापोटी जनतेच्या पैशांची उधळण होत असल्याची तक्रार राज्य शासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील यांनी दि.२९ मार्च रोजी आदेश काढले आहेत. त्यानुसार विभागातील एकही पोलीस अधिकाऱ्याला आता ‘एसी’ची हवा खाता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"