जळगाव : शहरातील सहा पोलीस ठाण्याच्या २८ वाहनांद्वारे शहरात दिवस व रात्रीची गस्त घातली जात असून त्यासाठी १२ अधिकारी, १२ अंमलदार व २८ कर्मचारी असे नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्याशिवाय प्रभारी अधिकारीही आपल्या वेळेनुसार गस्तीवर असतात. प्रभारी अधिकारी शक्यतो सायंकाळीच गस्तीवर असतात. सकाळ व संध्याकाळ सोनसाखळी पथक गस्तीवर असते तर इतर वेळी नियमित बीट मार्शलकडून गस्त घातली जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गस्तीसाठी चार सरकारी दुचाकी पुरविण्यात आल्या असून एका दुचाकीवर दोन कर्मचारी गस्तीवर असतात तर त्यांच्यावर नियंत्रणासाठी एक दुय्यम अधिकारी व एक अंमलदार यांच्यावर जबाबदारी सोपविली जाते. तालुका पोलीस ठाण्याला तीन दुचाकी देण्यात आलेल्या असून रामानंद नगर पोलीस ठाण्याला दोन तर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात एक दुचाकी पुरविण्यात आलेली आहे. शहर व शनी पेठ पोलीस ठाण्यांना प्रत्येकी दोन दुचाकी पुरविण्यात आलेल्या आहेत. निर्भया पथकाला चारचाकी असून दामिनी पथकांना दुचाकी देण्यात आलेली आहे. हे दोन्ही पथके फक्त दिवसा संपूर्ण शहरात गस्त घालतात तर पोलिसांचे बीट मार्शल यांची दर आठ तासांनी ड्युटी बदलते. पोलीस ठाणे निहाय चौकी व गस्त पॉईंट उभारण्यात आलेले आहेत, तेथेही कर्मचारी परिसरात गस्त घालतात.
शहरात गस्तीवरील वाहने : २८
दुचाकी : १४
चारचाकी : ०८
कर्मचारी : २८
पोलीस ठाणेनिहाय एका अधिकाऱ्याचे नियंत्रण
गस्तीवर असलेल्या पोलिसांवर नियंत्रणासाठी पोलीस स्टेशननिहाय एका दुय्यम अधिकाऱ्याची नियुक्ती असते. हा अधिकारी व एक अंमलदार असे दोघंही जण कर्मचारी गस्त घालतात की नाही याची तपासणी करतात. त्याशिवाय पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांचेही गस्तीवरील कर्मचाऱ्यांचे नियंत्रण असते. महिलांसाठी दामिनी व निर्भया पथकेही गस्तीवर असतात. दामिनी पथके दुचाकीवर तर निर्भय पथके चारचाकीने गस्त घालतात. दामिनी पथके व बीट मार्शल यांना दर एक तासाने लोकेशन द्यावे लागते. विभागातील बीट मार्शलवर उपअधीक्षकांचेही नियंत्रण असते, त्यांच्या अंगरक्षकाकडून सतत त्यांचे लोकेशन घेतले जाते.