जळगाव : शिर्डी येथून बंदोबस्त आटोपल्यानंतर दुचाकीने घरी परत येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी समोरुन येणाऱ्या वाहनाला चुकविण्यात झाडावर आदळली, त्यात सागर रमजान तडवी (३०,मुळ रा.हंबर्डी, ता.यावल ह.मु.पोलीस लाईन, जळगाव) हा जागीच ठार झाला तर मागे बसलेले संतोष प्रताप बोरसे (४४, रा.हनुमान नगर, रामेश्वर कॉलनी) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी साडे सहा वाजता देवकर रुग्णालयानजीकच्या एका हॉटेलसमोर झाला. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या सागर रमजान तडवी याची पंधरा दिवसापूर्वी शिर्डी येथील मंदिरात बंदोबस्तासाठी ड्युटी लागली होती. शुक्रवारी त्याची ड्युटी संपली होती तर संतोष बोरसे यांची १ डिसेंबर पासून शिर्डीला बंदोबस्तासाठी ड्युटी लागली होती. बोरसे यांची शनिवारी साप्ताहिक सुटी असल्याने ते सागरसोबत शुक्रवारी रात्री १० वाजता दुचाकीने (क्र. एम एच १९ डि एल ५३७०) घरी यायला निघाले. सकाळी साडे सहा वाजता देवकर रुग्णालयाजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला हुलकावणी दिली, त्यात दुचाकी ही रस्त्याच्या कडेला जावून झाडावर धडकली. डोक्याला गंभीर मार लागल्याने सागर हा जागीच गतप्राण झाला तर बोरसे जखमी झाले. त्यांना नजीकच्या देवकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सागरला मृत घोषीत केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तेथे उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, दीपक चौधरी व गफूर तडवी यांनी पंचनामा व इतर प्रक्रीय पूर्ण केली. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेह मुळ गावी हंबर्डी येथे नेण्यात आला.वडीलांचाही अपघातीच मृत्यूसागर याचे वडील रमजान तडवी पोलीस दलात होते. सागर सहा वर्षाचा असताना नशिराबादजवळ अपघात होऊन त्यात ते गतप्राण झाले होते. वडीलांपाठोपाठ मुलाचाही अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. सागर हा ३ फेब्रुवारी २०१२ रोजी अनुकंपा तत्वावर वडीलांच्या जागी पोलीस दलात रुजू झाला होता. पूर्वी तो रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणात तेथे त्याच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून त्याची बदली मुख्यालयात झाली होती. मधल्या काळात तो आरसीपीत कार्यरत होता. आता पंधरा दिवसासाठी त्याला शिर्डी येथे बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते.साखरपुडा झाला, १४ फेब्रुवारीला होते लग्नसागर याचा २२ नोव्हेंबर रोजी फैजपूर येथील मुलीशी साखरपुडा झाला होता. १४ फेब्रुवारी रोजी लग्न ठरले होते, तत्पूर्वीच अशी दुर्देवी घटना घडली. सागरच्या पश्चात आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. सागर हा एकुलता होता. आईचा आधारच गेल्याने तडवी कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दलातील सहकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
शिर्डी येथून बंदोबस्त करुन घरी परत येत असताना पोलीस कर्मचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 8:41 PM